कुणीतरी दिल्लीला गेलं होतं… बाबा मला मारलं सांगत! उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका
‘सत्ताधारी एकमेकाच्या नसा आवळत आहेत. आजच बातम्या आल्यात एक कुणीतरी दिल्लीला गेलं होतं… बाबा मला मारलं सांगत’, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बोचरी टीका केली. ही लाचारी का करावी लागतेय तर शिकायच्या वयात चांगला शिक्षक मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणला.
एमआयजी क्लब वांद्रे येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्लीवारीवर सडकून टीका करताना मिंधे-भाजपमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीवरही त्यांनी जबरदस्त प्रहार केला. महाराष्ट्रातील शाळांकडे पाहण्यासाठी आम्हाला वेळ नाही. आमची जबाबदारी मुलांना शिकवण्याची नाही. आम्हाला फक्त पक्ष फोडायचे, आमदार-खासदार फोडायचे. खुर्चीवर बसलो की बाकीचं जग जाऊ दे, असाच प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले. मग लोक नुसत्या ‘रेवडय़ां’वर भुलून चुकीची माणसं निवडतात. त्यापेक्षा लोकांनी योग्य निवड कशी करावी हे शिकवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे, असे आवाहनच त्यांनी शिक्षकांना केले. ‘इंटरनेटवर माहिती मिळते, पण माहितीला अनुभवाची जोड मिळाली की ती ज्ञानात रूपांतरित होते. त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर करून चांगल्या मूर्ती घडवण्याचं काम तुमचं आहे. या कामासाठी आमच्याकडून जे काही लागेल, ते आम्ही यथाशक्ती करू. ही एकच हमी मी तुम्हाला देतो,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुलींना फुकट शिक्षण कुठेय?
15 दिवसांपूर्वी मी मराठवाडय़ात फिरलो. महाराष्ट्रभर अतिवृष्टीमुळे आपत्ती निर्माण झाली. जमीन, घरं, शेती वाहून गेली. अशा परिस्थितीत शेतकरी विचारू लागले. खायचं काय? त्यांना धीर देण्यासाठी मी फिरलो आणि त्यांचं म्हणणं ऐकलं. एका महिलेने उद्वेगाने सांगितलं की ‘मुलींना फुकट शिक्षण म्हणतात, पण माझ्या मुलींना शिकवायला गेलं तर फी भरावी लागते. आता आमचं काहीच उरलं नाही. शिकवायचं कसं?’ तिच्या डोळ्यात पाणी होतं. मग मुलींना फुकट शिक्षण कुठेय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
निधी शिक्षणासाठी वापरा
शिवसेनेच्या माध्यमातून शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले आपले लोकप्रतिनिधी विधान परिषदेपर्यंत पोहोचून, कोणताही वाह्यातपणा न करता, शिक्षक म्हणून काम करताना आज वेगळा ठसा उमटवत आहेत. तुमचा आमदारकीचा निधी फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच वापरा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
शिक्षण थांबले, पण संस्कार थांबले नाहीत!
शिवसेनाप्रमुखांना आणि माझ्या आजोबांना शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही. दोघांनाही सातवीत फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे शाळा सोडावी लागली. पण शाळा सुटली तरी त्यांचे शिक्षण थांबले नाही. कारण घरात ‘संस्कार’ हा एक विषय असतो. आईवडील आपल्या वागणुकीतून मुलांना संस्कार देतात. आपण जसे वागतो, तसेच मुलं वागतात आणि त्यातूनच घराणेशाही निर्माण होते. वडिलांनी घोटाळा केला तर मुलगा त्याहून मोठा घोटाळा करणार.या सगळ्या गोष्टी संस्कारातून येतात,’ असेही ते म्हणाले.
शाळांना डिजिटल स्मार्ट बोर्ड वितरण
मुंबई शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर ह्यांच्या स्थानिक विकासनिधीतून मुंबईतील विविध शाळांकरिता ‘डिजिटल स्मार्ट बोर्ड’ वितरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना-युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर तसेच शिवसेना आणि शिक्षक सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आपल्या देशात शिक्षण आणि शिक्षक चांगला मिळाला नाही तर चांगल्या लोकांनासुद्धा देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं, याचं सोनम वांगचुक हे एक ठळक उदाहरण आहे. ते काय म्हणतात त्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या कपाळावरती नको तो शिक्का मारून दिलंय आतमध्ये टाकून. किती दिवस सडतील आतमध्ये देव जाणे.
महापालिकेचा बाप कोण हेच कळत नाही!
2014 च्या कालावधीत आम्ही आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅबमधील एसडी कार्डच्या माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी झाले. आदित्यनेही त्यानंतर शिक्षण विभागात चांगले काम केले. मात्र आता त्या योजना सुरू आहेत का नाही माहीत नाही. कारण गेल्या तीन-चार वर्षांत महापालिकेचा बाप कोण हेच कळत नाही. लुटालुटीचे काय चालले आहे तेही कोणाला कळत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा बाहेर कसा आला? कोणी काढला?
‘अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा बाहेर आला आहे. हा घोटाळा मुळात झाला कसा, तो होऊ कोणी दिला, झाल्यानंतर तो बाहेर कसा आला, कोणी काढला,’ असे प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाच्या वर्धापन दिन सोहळय़ात ते बोलत होते. ‘वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. मिंधे आणि अजित पवारांच्या बाबत तेच सुरू आहे. प्रकरणे बाहेर काढायची आणि मग क्लीन चिट द्यायची. या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यांवर टांगती तलवार ठेवायची हे राजकारण सुरू आहे, असे ते म्हणाले.
Comments are closed.