Squatting Toilet VS Sitting Toilet: घरात कुठलं टॉयलेट तुमच्यासाठी जास्त फायदेशीर इंडियन की वेस्टर्न?

काही वर्षांपूर्वी भारतात घराघरात फक्त इंडियन टॉयलेट म्हणजेच भारतीय पद्धतीचं शौचालय दिसत होतं. मात्र आज पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही कारण आता काळ बदललाय. शहरांमध्येच नाही तर गावांपर्यंत वेस्टर्न टॉयलेट दिसतात. मॉल, रेल्वे स्टेशन, ऑफिस, हॉस्पिटल अशा ठिकाणी तर बहुतांश वेस्टर्न टॉयलेटच असतात. (indian toilet vs western toilet which is better for health)

बर्‍याच लोकांना वेस्टर्न टॉयलेट जास्त आरामदायी आणि स्वच्छ वाटतात. काहींना इंडियन टॉयलेट वापरणं कठीण जातं. पण खरंच कोणतं टॉयलेट आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगलं आहे, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

भारतीय आणि वेस्टर्न टॉयलेटमध्ये एक मोठा फरक आहे तो म्हणजे बसण्याची पद्धत. इंडियन टॉयलेटमध्ये व्यक्ती जमिनीला बसते, म्हणजे पाय दुमडून बसण्याची स्थिती असते. ही शरीरासाठी नैसर्गिक पोझिशन मानली जाते. या पद्धतीत पोटावर जास्त दबाव येतो, त्यामुळे मलविसर्जन सोपं होतं. पोट साफ करताना शरीरावर फारसा ताण येत नाही.

याच्या उलट वेस्टर्न टॉयलेटमध्ये खुर्चीसारखं बसायला मिळतं. ही स्थिती आरामदायी वाटते, पण पोटाच्या स्नायूंवर नैसर्गिक दबाव येत नाही. त्यामुळे काही वेळा पोट पूर्णपणे साफ होत नाही आणि जोर लावावा लागतो. जास्त जोर दिल्यास पाइल्स, फिशर, भगंदर अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.

स्वच्छतेच्या दृष्टीनेही इंडियन टॉयलेट जास्त सुरक्षित मानलं जातं. यामध्ये शरीराचा थेट संपर्क टॉयलेटशी येत नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी असतो. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी वेस्टर्न सीटवर बसताना अनेकांना संकोच वाटतो, कारण तिथे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. भारतीय टॉयलेटमध्ये पाण्याचा वापर अधिक होतो, त्यामुळे स्वच्छता चांगल्या पद्धतीने होते.

शारीरिक हालचालींच्या बाबतीत भारतीय टॉयलेट अधिक फायदेशीर ठरतं. कारण जमिनीवर बसल्यामुळे पाय, कंबर आणि पोटाच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. रक्तप्रवाह सुधारतो आणि पचनक्रिया चांगली होते. अनेकजण सांगतात की भारतीय टॉयलेट वापरल्यावर पोट लवकर आणि नीट साफ होतं.

दुसऱ्या बाजूला वेस्टर्न टॉयलेटचेही काही फायदे आहेत. ज्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा पाठीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी इंडियन टॉयलेट वापरणं कठीण होतं. वृद्ध व्यक्तींना उठताना बसताना त्रास होतो, त्यामुळे त्यांच्यासाठी वेस्टर्न टॉयलेट अधिक सोयीचं ठरतं. लहान मुले आणि अपंग व्यक्तींसाठी सुद्धा वेस्टर्न टॉयलेट वापरणं सोपं असतं. तर याउलट गर्भवती महिलांच्या बाबतीत जमिनीवर बसण्याची पद्धत अधिक नैसर्गिक मानली जाते, कारण त्यामुळे पोटावर अनावश्यक ताण येत नाही आणि शरीराला आधार मिळतो.

एकंदरीत सांगायचं तर दोन्ही टॉयलेटच्या पद्धतींचे आपापले फायदे तोटे आहेत. पण पोटाच्या आरोग्यासाठी, पचनासाठी आणि स्वच्छतेच्या दृष्टीने भारतीय टॉयलेट अधिक फायदेशीर ठरतं. तर शारीरिक अडचणी असलेल्या लोकांसाठी वेस्टर्न टॉयलेट अधिक योग्य ठरतं. त्यामुळे आपल्या शरीराच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडणं सर्वात महत्त्वाचं आहे.

Comments are closed.