इंजिनमध्ये बिघाड झाल्याने 'आरपी' विमान उतरले
वृत्तसंस्था/जैसलमेर
इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर भारतीय हवाई दलाला राजस्थानमधील जैसलमेर येथील एका शेतात रिमोटली पायलटेड (आरपी) विमान उतरवावे लागले. घटनेच्यावेळी ‘आरपी’ विमान नियमित प्रशिक्षण मोहिमेवर होते. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर ते जैसलमेरजवळील एका शेतात सुरक्षितपणे उतरवण्यात आले. याप्रकरणी हवाई दलाकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. लँडिंग दरम्यान विमानाला कोणतेही नुकसान झाले नसल्याचे हवाई दल अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ‘आरपीए’ला सामान्यत: ड्रोन म्हणूनही ओळखले जाते. त्याचे वजन 25 किलोग्रॅम ते 150 किलोग्रॅम दरम्यान असते. ते पायलटशिवाय धोकादायक भागात उडवता येते. ते सलग 6 ते 8 तास उडू शकते. भारतात सध्या रुस्तम, तापस आणि हेरॉन सारखे ‘आरपीए’ हवाई दलाच्या ताफ्यात आहेत.
Comments are closed.