ईडीने रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आरोपपत्र दाखल केले
संजय भंडारी यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरण
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ब्रिटनमधील संरक्षण व्यापारी संजय भंडारी यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात गुरुवारी हे आरोपपत्र दाखल केल्याने त्यांच्या परिवाराची चिंता वाढली आहे. यावर्षी जुलैमध्ये पीएमएलए अंतर्गत वड्रा यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
22 सप्टेंबर 2016 रोजी प्राप्तिकर विभागाने ईडीला पाठवलेल्या नोटीसने या प्रकरणाची सुरुवात झाल्यानंतर 9 फेब्रुवारी 2017 रोजी झंडेवालन येथील प्राप्तिकर कार्यालयाकडून आणखी एक पत्र आले. या सर्व प्रकरणात शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारी यांनी त्यांची परदेशी मालमत्ता, परदेशी बँक खाती आणि लंडनमधील मालमत्ता यांच्यासंबंधीची माहिती गोपनीय ठेवल्याचे आढळून आले होते. कायद्यानुसार हा एक गंभीर गुन्हा असल्याने 2015 च्या काळा पैसा कायदा अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली. 3 एप्रिल 2018 रोजी प्राप्तिकर विभागाने अंमलबजावणी संचालनालयाला एक पत्र पाठवून त्यांना ब्लॅक मनी कायद्याच्या कलम 51(1) अंतर्गत संजय भंडारी यांच्यावर खटला चालवण्यासाठी कलम 55 अंतर्गत मंजुरी मिळाली होती. हा गुन्हा पीएमएलए अंतर्गत चालविण्यात आला होता.
तपासादरम्यान प्राप्तिकर विभागाने भंडारी यांच्या मालमत्तेवर छापा टाकला. तिथून जप्त केलेल्या डिजिटल डेटाने एक नवीन वळण दिले. डेटामध्ये असलेल्या ईमेलमध्ये लंडनमधील ब्रायनस्टन स्क्वेअरमधील 12 क्रमांकाच्या मालमत्तेची संपूर्ण माहिती उघड झाली. त्याची किंमत अंदाजे 19 लाख पौंड इतकी होती. ईमेलमध्ये भंडारींचे युकेमधील नातेवाईक सुमित चढ्ढा, रॉबर्ट वड्रा आणि त्यांचे वैयक्तिक सहाय्यक मनोज अरोरा यांची नावे होती. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने वड्रा यांच्या निकटवर्तीयांच्या निवासांवरही छापे टाकल्यानंतर बरीच कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
ईडीने 2023 मध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये भंडारी यांनी 2009 मध्ये लंडनमधील 12 ब्रायनस्टन स्क्वेअर येथे एक घर खरेदी केले आणि रॉबर्ट वड्रा यांच्या सूचनेनुसार त्याचे नूतनीकरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. नूतनीकरणासाठी वड्रा यांनी स्वत: निधी पुरवला, असेही म्हटले होते. मात्र, त्यांनी लंडनमध्ये कोणतीही मालमत्ता असल्याचा इन्कार केला आहे. या आरोपांना ‘राजकीय षड्यांत्र’ असे म्हणत राजकीय हेतूंसाठी आपला छळ केला जात असल्याचा दावा करण्यात आला होता. अजूनही राजस्थानमधील बिकानेर येथील जमीन व्यवहारात कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित वेगळ्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी वड्रा यांची चौकशी करत आहे.
Comments are closed.