महाराष्ट्रातील शुटरसोबत मध्यप्रदेशमध्ये छेडछाडीचे प्रकरण, ड्रायव्हर-कंडक्टरविरोधात तक्रार दाखल

मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदौरमध्ये महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना घडली आहे. राष्ट्रीय स्तरावरील एका महिला शूटरने खाजगी बसच्या कंडक्टरवर अनुचित पद्धतीने स्पर्श (बॅड टच) केल्याचा गंभीर आरोप केला. ही घटना सोमवार-मंगळवारच्या दरम्यान रात्री घडली.

पीडित शूटर पुण्यातील रहिवासी असून ती नुकतीच भोपाळमध्ये झालेल्या एका राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सहभागी होऊन परतत होती. ती इंदौरमार्गे पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी बसमध्ये प्रवास करत असताना कंडक्टरने तिकीट तपासणीच्या नावाखाली तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तिने केला.

दरम्यान बस इंदौरच्या राजेंद्र नगर परिसरात पोहोचली. त्याठिकाणी नियमित नाईट पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी बस थांबवली. शूटरने पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर तणाव निर्माण झाला. पोलिस कारवाईची भीती वाटल्याने बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही बसमधून उतरून अंधारात पळून गेले.

महिला शूटरने विरोध व्यक्त करताच कंडक्टरसोबत ड्रायव्हरही तिच्यावर भडकला. दोघांनीही तिच्याशी उर्मट भाषेत वर्तन केल्याचे सांगितले जाते. संतापाच्या भरात शूटरने दोघांना चांगलेच चोप दिल्याचेही प्रवाशांनी सांगितले.

यावेळी उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनीही पोलिसांना सांगितले की घटनेच्या वेळी ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही नशेत होते. त्यांचा वागणूक अधिक आक्रमक होत चालल्याने प्रवाशांनी बस सोडून बाहेर पडत ट्रॅव्हल्स ऑफिस आणि पोलिसांना फोन करून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

राजेंद्र नगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नवा ड्रायव्हर आणि कंडक्टर उपलब्ध करून दिल्यानंतर बसने उशिरा म्हणजे सुमारे सव्वा तीन वाजता पुढील प्रवास सुरू केला. तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांनी महिला शूटरला लिखित तक्रार देण्यास सांगितले. ती प्रथम कुटुंबाशी चर्चा करून निर्णय घेईल असे म्हणाली, परंतु नंतर तिने लिखित तक्रार दिली.

या घटनेवर युवाशक्ती क्रिडा मंचाचे आकाश झांबरे पाटील यांनी तीव्र भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राष्ट्रीय खेळाडूसोबत मध्यप्रदेशमध्ये बस ड्रायव्हर व कंडक्टरने छेडछाड केल्याचे वृत्त आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. माझी मध्यप्रदेश शासन आणि महाराष्ट्र शासन या दोन्ही राज्य सरकारांना विनंती आहे की, या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून खेळाडूला न्याय द्यावा.

मुलींनी मुक्त पणे देशात वावरण्यासाठी व पालकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवे, तेव्हाच गुणवान खेळाडू तयार होतील व देशाचे प्रतिनिधित्व करतील, असेही झांबरे महा स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले.

Comments are closed.