Pregnancy Tips: गर्भधारणा कधी सोपी होते? किती वेळा संबंध ठेवावा लागतो, जाणून घ्या संपूर्ण

लग्नानंतर किंवा कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक जोडप्यांच्या मनात एकच प्रश्न असतो प्रेग्नंट होण्यासाठी किती वेळा शारीरिक संबंध ठेवावे लागतात आणि किती दिवस प्रयत्न करायला हवेत? (how many times to try for pregnancy in month)

महिलांच्या शरीरात प्रत्येक महिन्याला एकदा ओव्ह्युलेशन होते. म्हणजेच अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर पडते. हा काळ खूप महत्त्वाचा असतो, कारण याच दिवसांत गर्भधारणेची शक्यता सर्वाधिक असते. साधारणपणे एका महिन्यात फक्त 4 ते 5 दिवस असे असतात, जेव्हा प्रेग्नंट होण्याची शक्यता जास्त असते. ओव्ह्युलेशनच्या दोन दिवस आधीपासून ते ओव्ह्युलेशनच्या दिवसापर्यंतचा काळ सर्वात अनुकूल मानला जातो. या दिवसांमध्ये दररोज किंवा एक दिवस सोडून एकदा शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते.

संपूर्ण आठवड्याचा विचार केला, तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा संबंध ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे ओव्ह्युलेशनचे महत्त्वाचे दिवस चुकण्याची शक्यता कमी होते. कारण अनेक महिलांना नेमकं ओव्ह्युलेशन कधी होतं हे लक्षात येत नाही.

आजकाल ओव्ह्युलेशन टेस्ट किट आणि पीरियड ट्रॅकर अॅप्स सहज उपलब्ध असतात. या साधनांच्या मदतीने कोणते दिवस गर्भधारणेसाठी योग्य आहेत हे समजायला मदत होते. नियमितपणे पीरियड सायकलची नोंद ठेवली, तर योग्य वेळ ओळखणं सोपं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत प्रयत्न केले म्हणजे लगेच प्रेग्नन्सी होतेच असं नाही. पूर्ण हेल्दी असलेल्या जोडप्यांनाही गर्भधारणा होण्यासाठी काही वेळ लागतो. अनेक वेळा यासाठी 3 ते 6 महिने लागणे अगदी सामान्य मानले जाते.

जर नियमित प्रयत्न करूनही एक वर्षापर्यंत गर्भधारणा होत नसेल, तर दोघांनीही एकदा तपासणी करून घेणे गरजेचे असते. तसेच महिलेचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि 6 महिने प्रयत्न करूनही यश येत नसेल, तर वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

गरोदर होण्यासाठी शरीराची आणि मनाची तयारी देखील तितकीच महत्त्वाची आहे. योग्य आहार, पुरेशी झोप, तणाव कमी ठेवणे आणि नियमित दिनचर्या याचा गर्भधारणेवर सकारात्मक परिणाम होतो. म्हणून एकंदरीत पाहता योग्य दिवस ओळखून नियमित अंतराने संबंध ठेवणे आणि संयम ठेवणे हे गर्भधारणेसाठी महत्वाचे आहे.

Comments are closed.