WPL 2026 – लिलाव प्रक्रियेचं धुमशान! 73 जागांसाठी 277 खेळाडू नशीब आजमावणार, कोण होणार मालामाल?

Women’s Premier League 2026 चा धमाका आतापासूनच सुरू झाला आहे. लिलाव प्रक्रियेसाठी 277 खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. 277 खेळाडू WPL 2026 साठी लिलाव प्रक्रियेमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत. मात्र, संघांना फक्त 73 खेळाडूंनाच आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेता येणार आहे. यासाठी 27 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

दिल्लीमध्ये होणाऱ्या लिलाव प्रक्रियेसाठी 277 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या 277 खेळाडूंमध्ये 194 हिंदुस्थानी खेळाडूंचा समावेश आहे. या 194 खेळाडूंमध्ये 52 कॅप्ड खेळाडू आणि 142 अनकॅप्ड खेळाडूंवर बोली लागणार आहे. तसेच उर्वरित खेळाडूंमध्ये 66 परदेशी कॅप्ड खेळाडू आणि 17 परदेशी अनकॅप्ड खेळाडू लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. हिंदुस्थानी आणि परदेशी खेळाडूंसाठी वेगवेगळे स्लॉट पक्के करण्यात आले आहेत. यामध्ये हिंदुस्थानी खेळाडूंसाठी 50 आणि परदेशी खेळाडूंसाठी 23 स्लॉट राखीव ठेवण्यात आले आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये सर्वांच्या नजरा हिंदुस्थानच्या दीप्ती शर्मा, रेणुका सिंह, न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाइन आणि अमेलिया केर, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन, ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली, मेग लॅनिंग आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोलवार्ड्ट या आठ खेळाडूंवर संघ मालकांच्या नजरा असणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोलवार्ड्ट सध्या तुफान फॉर्मात आहे. त्यामुळे लॉराला संघात घेण्यासाठी संघ मालकांमध्ये चुरस पाहायला मिळेल. तसेच एलिसा हिली, मेग लॅनिंग, सोफी डिव्हाइन, अमेलिया केर, सोफी एक्लेस्टोन या सर्वच विदेशी खेळाडूंनी मागील हंगांमांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तसेच दीप्ती शर्मा आणि रेणुकी सिंह या दोघीही वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा महत्तवाचा भाग राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. या सर्व आठ खेळाडूंवर पहिल्या सेटमध्ये बोली लागणार आहे. त्यामुळे WPL 2026 च्या लिलावाची सुरुवातच धमाकेदार होणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगताना दिसत आहे. लिलाव प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आलेल्या किंमत श्रेणीनुसार, 50 लाखाहून अधिक किंमत असणारे 19 खेळाडू, 40 लाख रुपयांच्या गटात 11 खेळाडू आणि 30 लाख रुपयांच्या श्रेणीमध्ये 88 खेळाडूंचा समावेश आहे.

Comments are closed.