Ashes 2025 – वेगवान गोलंदाजांचा तिखट मारा! स्टोक्सनंतर स्टार्कनेही फलंदांजांना नाचवलं; 43 वर्षांनी नवा विक्रम प्रस्थापित

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बहुप्रतिक्षित अॅशेज मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी गोलंदाजांची ‘दादा’गिरी पाहायला मिळाली. फलंदाजांना बॅकफुटवर ढाकलत गोलंदाजांचा वरचष्मा पाहायला मिळाला. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव 172 धावांवर संपुष्टात आला तर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात दिवसाअखेर 9 विकेट गमावत 123 धावा केल्या आहेत. म्हणजे एकाच दिवसात 19 फलंदाज आल्या पावली माघारी परतले.
ऑस्ट्रेलियाच्या पर्थ स्टेडियमवर उभय संघांमध्ये द्वंद्व सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव फक्त 172 धावांमध्ये संपुष्टात आला. मिचेल स्टार्कने 12.5 षटकांमध्ये 58 धावा खर्च करत 7 विकेट घेतल्या. प्रत्तुत्तरात ऑस्ट्रेलियाची गाडीला सुद्धा इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक ब्रेक मारला. कर्णधार बेन स्टोक्सने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबुत पाठवला. त्याने सहा षटकांमध्ये 23 धावा खर्च करत 5 विकेट घेतल्या. बेन स्टोक्सची ही कामगिरी वरचढ ठरली असून तब्बल 43 वर्षांनी नवा विक्रम अॅशेज मालिकेच्या पहिल्याच दिवशी प्रस्थापिथ झाला आहे.
अॅशेज मालिकेत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची कामगिरी कौतुकास पात्र ठरली आहे. 1982 नंतर बेन स्टोक्स इंग्लंडचा असा पहिलाच कर्णधार ठरला आहे, ज्याने अॅशेज मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट घेतल्या आहेत. बेन स्टोक्सपूर्वी 1982 साली कर्णधार असताना बॉब विलिसने अॅशेज मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर अशी कामगिरी इंग्लंडच्या कोणत्याच कर्णधाराला करता आली नव्हती. बेन स्टोक्सने आता हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Comments are closed.