सुपर ओव्हरमध्ये सुपर धक्का, हिंदुस्थान ‘अ’ चे आशिया कपचे स्वप्नभंग

सामना 20 षटकांचा असला तरी निकाल अवघ्या दोन चेंडूंत लागतो. रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये हिंदुस्थान ‘अ’ विरुद्ध बांगलादेश ‘अ’चा थरारही तसाच 194 धावांचा पाठलाग करताना आपणही प्रतिस्पर्ध्याइतक्याच धावा केल्या, पण सुपर ओव्हरमध्ये क्रिकेट देवतेने पाठ फिरवली आणि कर्णधाराने मागे वळून पाहिलं तर आशा नामक नाव तरंगताना दिसली आणि अचानक ती बुडाली.

नाटय़मयरीत्या उपांत्य फेरीचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर कर्णधार जितेश शर्मा-रमणदीप सिंग सुपर ओव्हरमध्ये षटकारबाजी करायला उतरले, पण हिंदुस्थानच्या धावफलकावर ते एकही धाव लावू शकले नाही. रिपॉन मोंडलने पहिल्या दोन चेंडूंत दोन विकेट घेत हिंदुस्थानला शून्यावरच बाद केले आणि विजयी लक्ष्य दोन चेंडूंत करत अंतिम फेरीत झेप घेतली.

त्याआधी बांगलादेशसाठी हबीबुर रहमान सोहन, मेहरूब हसन यांनी 11 षटकारांचा पाऊस पाडत संघाला 194 अशी जबरदस्त धावसंख्या उभारून दिली. एकवेळ बांगलादेशने 18 षटकांत 144 धावा केल्या होत्या. तेव्हा मेहरूब आणि यासिर अलीने 6 षटकार आणि 3 चौकारांची बरसात करत 50 धावा चोपून काढल्या. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आवश्यक 195 धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या, जितेश शर्मा, नेहाल वधेरा यांनी आपापली फटकेबाजीची कामगिरी चोख बजावली. धावा झाल्या, चौकार-षटकारही ठोकले. पण कुणीही म्हणावं तशी ‘मी खांद्यावर घेऊन जातो रे मंडळी!’ अशी घोषणा केली नाही. आपलाही डाव 194 वर थांबला. जिंकणारा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला आणि सुपर ओव्हरमध्ये हिंदुस्थानच्या ‘सिक्सरकिंग’नी माती खाल्ली.

Comments are closed.