आसाम वेगळे करण्याचा कट

2020 च्या दिल्ली दंगल सूत्रधारांवर गंभीर आरोप

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्ली येथे 2020 मध्ये झालेल्या धार्मिक दंगलीची पाळेमुळे खोलवर पसरलेली असून या दंगलींच्या सूत्रधारांचे याहूनही मोठे कारस्थान होते, असे प्रतिपादन दिल्ल्ली पोलिसांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आले आहे. यासंबंधातील पुरावे म्हणून दिल्ली पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फूटेजीस न्यायालयात सादर केली आहेत. पोलिसांच्या वतीने अतिरिक्त महाधिवक्ता सूयप्रकाश राजू आहेत. दिल्ली दंगल हा एका मोठ्या राष्ट्रव्यापी कारस्थानाचा भाग असून या दंगलखोरांनी आसाम भारतापासून तोडण्याचे कारस्थानही केले होते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

दिल्ली दंगलीचे सूत्रधार उमर खालिद, शर्जील इमाम, गुल्फीशा फातिमा आणि इतरांवर सध्या अभियोग चालविला जात आहे. या आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका सादर केली आहे. या याचिकेवर गेले तीन दिवस सुनावणी केली जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

दिल्ली दंगल भयानक

दिल्लीतील दंगल ही साधी नव्हती. तिचे स्वरुप अत्यंत भयानक होते. या दंगलीत अॅसिड बाँब्ज आणि पेट्रोल बाँब्जचा मुक्तहस्ते उपयोग करण्यात आला होता. पोलिसांवरही मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले होते. दंगलखोरांनी अनेक स्थानी लाठ्या, काठ्या आणि दगडांचा साठा करुन ठेवला होता. दंगलखोरांचा हिंसाचार दिसू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे झाकून ठेवण्यात आले होते. या दंगलीत एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. ही दंगल ‘चक्का जाम’ आंदोलनाच्या आडून करण्यात आली होती. या दंगलीचा उद्देश दिल्लीत अनेक स्थानी हिंसाचार भडकविणे हा होता, असे त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

आसाम म्हणजे तोडन्याची मंडळी

ऊर्वरित भारत आणि आसाम यांना जोडणारी उत्तरेकडची चिंचोळी पट्टी ताब्यात घेऊन आसाम भारतापासून तोडण्याची या दंगलीच्या सूत्रधारांची योजना होती. या साठी विदेशी शक्तींचे साहाय्य घेतले जाणार होते. यासाठी याच सूत्रधारांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथेही मोठी दंगल घडविली होती. या दंगलीत ऊर्वरित भारताला आसामशी जोडणाऱ्या चिंचोळ्या पट्टीतही हल्ले करण्यात आले होते. मुर्शिदाबादप्रमाणेच हावडा, माल्दा, नाडिया, आणि उत्तर 24 परगाणा जिल्ह्यांमध्येही दंगली घडविण्यात आल्या होत्या. लालगोला आणि कृष्णपूर येथे पाच रेल्वेगाड्यांना आग लावण्यात आली होती. चार रेल्वेस्थानकांवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि अग्निकांड घडविण्यात आले होते. यामुळे भारतीय रेल्वेची 70 कोटी हून अधिक रुपयांची हानी झाली होती. अशा प्रकारे दिल्ली दंगल हे हिमनगाचे केवळ दिसणारे टोक होते. सूत्रधारांनी या दंगलीपेक्षाही फार मोठे कारस्थान योजिलेले होते, असा युक्तीवाद अतिरिक्त महाधिवक्ता राजू यांनी केला.

जामिनावर सोडल्यास उत्पात

दिल्ली दंगलींचे गांभीर्य मोठे आहे. ही दंगल स्थानिक नसून राष्ट्रव्यापी कारस्थानाचा एक भाग आहे. या दंगलीचे सूत्रधार संपूर्ण देशामध्ये हाहाकार माजविण्याच्या तयारी करत होते, हे अनेक सीसीटीव्ही फूटेजीसवरुन स्पष्ट होत आहे. अशा परिस्थितीत या आरोपींना जामीन दिल्यास ते आणखी उत्पात माजवू शकतात. असे आरोपींना समाजात मुक्त संचार करु देणे समाजहिताच्या आणि देशहिताच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. या आरोपींच्या विरोधात सरकारजवळ भक्कम पुरावा असून त्याच्या आधारे अभियोग सादर करण्यात आला आहे. अभियोग लवकरात लवकर चालविण्यासाठी सरकार सज्ज आणि कटिबद्ध आहे. त्यामुळे आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला जावा, अशी मागणी राजू यांनी केली. या संदर्भात त्यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक कागदपत्रे आणि विशेषत: व्हिडीओ पुरावे सादर केले आहेत. याचिकेवर पुढच्या आठवड्यात निर्णय शक्य आहे.

Comments are closed.