प्रत्येक घुसखोराला बाहेर काढले जाईल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्धार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतात बेकायदेशरीपणे घुसलेल्या प्रत्येकाला आमचे केंद्र सरकार एकहाती बाहेर काढणार आहे. कोणीही कितीही विरोध केला तरी हे काम आम्ही करुनच दाखविणार आहोत, असे प्रतिआव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. पश्चिम बंगालच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी त्या राज्यात मतदारसूची सुधारण्याच्या अभियानाला विरोध केला आहे. या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून शाह यांनी घुसखोरांना या देशात कोणतेही स्थान नाही, असे विधान केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारसूची स्वच्छ करण्याचे अभियान चालविले आहे. आमचा या अभियानाला पूर्ण पाठिंबा आहे. हे अभियान खऱ्या भारतीय नागरिकाच्या सुरक्षेसाठी आहे. या अभियानाच्या अंतर्गत भारताच्या मतदारसूचीत घुसविण्यात आलेली अवैध नागरिकांची नावे काढण्यात येणार आहेत. भारतात मतदान करण्याचा अधिकार केवळ भारताच्या वैध नागरिकांनाच आहे. बिहारमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारसूची सुधारणा अभियान यशस्वी करुन दाखविले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही यासाठी त्याची प्रशंसा केली आहे. ममता बॅनर्जींचा या अभियानाला विरोध त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आहे. त्यांना पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक घुसखोर मतदारांच्या आधारावर जिंकायची आहे काय, असा संशय येतो. त्यामुळे त्या मतदारसूची स्वच्छ करण्याच्या पवित्र कामाला विरोध करीत आहेत. पण देशात घुसलेल्या प्रत्येक अवैध व्यक्तीला देशाबाहेर काढणे हा आमचा कार्यक्रम असून तेच आमचे ध्येय आहे. ते साध्य केल्याशिवाय आम्ही कदापिही स्वस्थ बसणार नाही. आमच्या या ध्येयाला भारतातल्या प्रत्येक वैध नागरिकाचे समर्थन आहे. विरोधकांच्या घुसखोरी समर्थनाला बिहारच्या मतदारांनी खड्यासारखे वगळले आहे. यातून विरोधकांनी योग्य तो बोध घ्यावा आणि देशातून घुसखोरांना बाहेर काढण्याच्या आमच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांनी उद्देशून केले आहे. ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला मतदारसूची सुधारणा अभियान मागे घेण्याची सूचना केली होती. पण अमित शाह यांनी ही सूचना धुडकावली.

Comments are closed.