पुणेकरांसाठी खुशखबर….पुण्यातील 'हे' चार महत्त्वाचे महामार्ग एकमेकांना जोडले जाणार, नवीन भूमिगत रस्ता तयार होणार

पुणे : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील जनता वाहतूककोंडीने त्रस्त आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेले पुणे आता वाहतूक कोंडीसाठीही ओळखले जात आहे.
दरम्यान, वाढत्या वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी रामबाण उपाय समोर आला आहे. वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शहरात नवीन भुयारी रस्ता तयार करण्यात येणार आहे.
हा रस्ता सुमारे ४५ किलोमीटर लांबीचा असेल, असेही सांगण्यात आले आहे. या भूमिगत रस्त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा रस्ता शहरातील चार महत्त्वाच्या महामार्गांना जोडणार आहे.
अहिल्यानगर, सोलापूर, सातारा आणि मुंबई या सर्व प्रमुख महामार्गांना जोडणारा हा रस्ता पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यात गेम चेंजरची भूमिका बजावू शकतो.
दरम्यान, या प्रकल्पाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रारूप आराखडा तयार करून तो पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सल्लागार संस्थेने सादर केला आहे.
हा अहवाल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सादर करण्यात आल्याने आता प्राधिकरण त्यावर पुढील निर्णय घेणार आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कात्रज-येरवडा रस्ता भूमिगत करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
प्राथमिक मंजुरी दिल्यानंतर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ट्विन बोगदा’ पद्धतीने प्रकल्पाची आखणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पीएमआरडीएने व्यवहार्यता अभ्यासासाठी निविदा काढल्या.
तीनपैकी एका कंपनीकडे सर्वेक्षणाचे काम सोपविण्यात आले होते. संबंधित कंपनीने सर्वेक्षण पूर्ण करून आराखडा सादर केला आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यात तळजाई आणि वेताळ टेकड्यांखालील भूमिगत मार्गाचा या प्रकल्पात समावेश आहे.
स्वारगेट, जगताप डेअरी आणि कात्रज येथे प्रवेश-निर्गमन मार्ग दिले जातील. शिवाजीनगर-येरवडा, येरवडा-खदिमशीन चौक आणि जगताप डेअरी-कोथरूड हे प्रमुख भूमिगत मार्ग असतील. भूगर्भात सुमारे 30 मीटर खोलीवर सहा पदरी रस्त्याची रचना करण्यात आली आहे.
हा रस्ता तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर कोथरूड, सेनापती बापट रोड, कात्रज, लष्कर परिसर, येरवडा आणि मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. विशेष म्हणजे भुयारी मेट्रो प्रकल्पात कोणताही अडथळा न आणता मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार या प्रकल्पासाठी 20 ते 22 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पीएमआरडीएची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. दरम्यान, पीएमआरडीए आणि राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.