चार कामगार संहिता लागू

कामगार कायदा सुधारणेच्या दिशेने मोठे पाऊल

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशातील कामगार कायद्यांमध्ये व्यापक सुधारणा करणारे मोठे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. संसदेने संमत केलेल्या चार नव्या कामगार संहिता लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जुने कामगार कायदे आता कालबाह्या होणार आहेत. या कामगार संहितांमुळे अनियमित कामगारांनाही संरक्षण मिळणार आहे.

कामगार वेतन संहिता (2019), औद्योगिक संबंध संहिता (2020), सामाजिक सुरक्षा संहिता (2020) आणि कामस्थान सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थिती संहिता (2020) या चार कामगार संहितांचे कार्यान्वयनाचा प्रारंभ शुक्रवारपासून करण्यात आला आहे. या चार संहितांमुळे जुने 29 कायदे आता कालबाह्या होणार आहेत. या नव्या संहितांमुळे कामगारांचे वेतन, कामगारांची सुरक्षा आणि त्यांचे हित यांचे रक्षण होणार आहे, असे केंद्रीय कामगार विभागाने प्रतिपादन केले आहे. या नव्या संहितांमध्ये महिला कामगारांच्या हिताचा विशेष विचार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून प्रशंसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या संहितांची प्रशंसा केली आहे. नव्या संहितांमुळे कामगार हिताच्या नव्या युगाचा प्रारंभ होत आहे. का संहितांमुळे कामगारांच्या सर्वंकष सुरक्षेचा पाया रचला जाणार आहे. कामगारांना किमान आणि वेळेवर वेतन मिळण्याची सोय या संहितांमध्ये आहे. कामाच्या स्थानी सुरक्षा भक्कम होणार आहे. तसेच कामगारांना अधिक आर्थिक आणि वेतन सुविधा देणाऱ्या या संहिता आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशांमध्ये स्पष्ट केले आहे.

नारीशक्ती, युवाशक्तीला प्राधान्य

या चार संहितांमध्ये महिला कामगार आणि युवाशक्तीचा विशेष विचार करण्यात आला असून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीच्या अनेक तरतुदी या कायद्यांमध्ये आहेत. महिला आणि युवक यांच्यासाठी या संहितांमुळे भविष्यकाळासाठी सज्ज असणाऱ्या हितकारी इकोसिस्टिमची रचना होईल. कामगारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि भारताचा वेगवान आर्थिक विकास ही दोन्ही ध्येये साध्य करण्याची क्षमता या संहितांमध्ये आहे, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

व्यवसायानुकूल वातावरणनिर्मिती

भारतात उद्योग, व्यवसाय, उत्पादन केंद्रे आदी स्थापन करण्यासाठी व्ययसायानुकूल वातावरणाची निर्मिती या नव्या संहितांमुळे होऊ शकेल. भारतात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आणि विदेशी तंत्रज्ञानही येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी देशातील औद्योगिक वातावरण अनुकूल करण्याचे काम सध्याच्या केंद्र सरकारने, ते सत्तेवर आल्यापासून हाती घेतले आहे. याच ध्येयाचा एक महत्वाचा भाग म्हणून या नव्या कामगार संहितांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यकाळात त्यांचे मोठे योगदान आपल्या अर्थव्यवस्थेत असेल, असा आशावाद केंद्रीय कामगार कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला.

कामगार संहिता काय साधणार…

या कामगार संहितांमुळे कामगारांना विविध प्रकारची सुरक्षा मिळेल. त्यांच्या कामांचे सुसूत्रीकरण होईल. त्यांच्या हितांचे रक्षण होईल. देशातील कामगार व्यवस्थेचे सुलभीकरण होईल. देशातील कामगार जगाशी जोडला जाईल. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेतही प्रगती होईल. कामगारांमध्ये स्त्रीपुरुष भेद राहणार नाहीत. या संहितांच्या प्रभावी कार्यान्वयनासाठी ‘इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर’ मॉडेल आणण्यात आल्याने या संहितांचा लाभ संबंधितांना अधिक उत्तम प्रकारे घेता येईल. कामगार तंट्यांचे वेगवान निराकरण करण्याची सोय यात असल्याने कामगारांचा वेळ आणि पैसा यांची मोठ्या प्रमाणात बचत होईल. कामाच्या स्थानी त्यांना, विशेषत: महिला कामगारांना सुरक्षितता देण्यासाठी विषेश तरतुदी या संहितांमध्ये आहेत. आता सरकार या संहितांच्या प्रभावी कार्यान्वयनासाठी नियम आणि योजना आणणार आहे. एकंदर देशातील कामागार व्यवस्थेत व्यापक सुधारणा घडविण्याच्या दिशेने या संहिता काम करणार आहेत. अशा नव्या संहितांची नितांत आवश्यकता होती. आमच्या सरकारने हे आव्हान स्वीकारले आणि ते यशस्वीही करुन दाखविले, अशी भलावण केंद्रीय कामगार कल्याण मंत्र्यांनी त्यांच्या संदेशात केली आहे.

कामगारांचा लाभ कोणता…

या संहितांमुळे कामगारांच्या किमान वेतनाची शाश्वती निर्धारित होणार आहे. असंघटित कामगारांनाही आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. प्रत्येक कामगाराला रीतसर नियुक्तीपत्र द्यावे लागणार आहे. पूर्वनिर्धारित काळासाठी ज्यांना नोकरी मिळाली आहे, त्यांना एक वर्षाच्या नोकरीनंतर ग्रॅच्युईटीचा प्रारंभ होणार आहे. 40 वर्षे वयाच्यापेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक कामगाराच्या शरीरस्वास्थ्याचे परीक्षण प्रत्येक वर्षी केले जाईल. धोकादायक वातावरणात काम करणाऱ्या कामगारांना 100 टक्के आरोग्य सुरक्षा द्यावी लागणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानकांच्या अनुसार भारतातील प्रत्येक कामगाराला सामाजिक न्याय सुनिश्चित होणार आहे.

कामगार सुधारणा-सुरक्षेची हमी

ड नव्या कामगार संहितांमुळे जुने 29 कामगार कायदे कालबाह्या होणार

ड कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेची हमी संहितांमुळे मिळणार

ड महिला कामगारांना कामाच्या स्थानी सुरक्षेची विशेष व्यवस्था केली जाणार

ड कामगारांच्या सामाजिक न्यायाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे होणार

 

Comments are closed.