घराला लागलेल्या आगीत पती, पत्नी आणि मुलांचा मृत्यू
गुजरातमधील दुर्घटना : विवाहाच्या आदल्याच दिवशी दुर्घटना
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमधील गोध्रा येथे गुरुवारी रात्री उशिरा घराला लागलेल्या आगीच्या धुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मोठ्या मुलाच्या विवाहाची लगबग सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आहे. विवाहाची सर्व तयारी आदल्या रात्रीच करण्यात आली होती. विवाहासाठी ते शुक्रवारी सकाळी वापीला जाणार होते, परंतु तत्पूर्वीच आगीच्या विषारी धुराने त्यांचे प्राण घेतले. मृतांमध्ये कमलभाई दोशी (50), त्यांची पत्नी देवलाबेन (45), मोठा मुलगा देव (24) आणि धाकटा मुलगा राज (22) यांचा समावेश आहे.
गुरुवारी रात्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे किंवा इतर कारणांमुळे तळमजल्यावरील एका सोफ्याला आग लागली. घर काचेने बंद करण्यात आल्यामुळे विषारी धूर बाहेर पडू शकला नाही. कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. सकाळी घरातून धूर निघताना शेजाऱ्यांनी पाहिले आणि अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. पण तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता. दोशी कुटुंब वर्धमान ज्वेलर्सच्या मालकी हक्कामुळे गोध्रामध्ये प्रसिद्ध होते. दोशी कुटुंबीय ज्या घरातून लग्नासाठी निघणार होते त्याच घरातून चार सदस्यांच्या अंत्ययात्रा निघाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांनी ही घटना अत्यंत वेदनादायक असल्याचे म्हटले आहे. विवाहासारख्या आनंदाच्या प्रसंगी अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने संपूर्ण शहर हादरले आहे.
Comments are closed.