अजित पवारांचा फोडाफोडी फॉर्म्युला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत फोडाफोडी आणि इतर पक्षातून खेचाखेची करावी लागत आहे. भोर, राजगुरुनगर, इंदापूर आणि जेजुरी या नगरपरिषदांमध्ये बाहेरच्या पक्षातील उमेदवारांना आयात करून उभे केले आहे. तर काही ठिकाणी भाजप आणि मिंधे गटाबरोबर तडजोड करावी लागली आहे. यामुळे त्यांच्या राजकीय मर्यादा समोर आल्या आहेत.

नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातील ताकतीच्या मर्यादादेखील यामुळे समोर आल्या आहेत. भाजपने आपले बळ वाढविल्यानंतर अजित पवार यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले. हे आव्हान पेलण्यासाठी सर्वप्रथम पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाला फोडून आणि अनेक ठिकाणी पारंपरिक विरोधकांबरोबर तडजोडी करून त्यांना रिंगणात उतरावे लागले आहे.

बारामतीतील माळेगाव नगरपंचायतीमध्ये कट्टर विरोधक रंजन तावरे यांच्याबरोबर आघाडी करावी लागली. जेजुरी नगरपरिषदेमध्ये सर्व गटातील दिलीप बारभाई यांचे वर्चस्व होते. मात्र, त्यांच्या मुलासह माजी नगरसेवकांचा अजित पवार गटात प्रवेश करून घेत निवडणूक लढवावी लागली. भोर नगरपरिषदेमध्ये पूर्वाश्रमीच्या थोपटे गटातील रामचंद्र आचारे यांना फोडून अजित पवार गटामध्ये आणले गेले. याशिवाय मिंधे गटाच्या उमेदवारांची पळवापळवी अजित पवार गटाने केली

खेडमध्ये नगराध्यक्षपदासाठी अजित पवार गटाला तुल्यबळ उमेदवार नव्हता. सर्वपक्षीय प्रताप आहेर यांना गळाला लावून अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदासाठी उभे केले गेले आहे. तळेगाव नगरपरिषदेमध्ये भाजपचे परंपरागत वर्चस्व लक्षात घेता अजित पवार गटाकडून त्यांना अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद देण्याची तडजोड करावी लागली. फुरसुंगी नगरपंचायतीमध्ये देखील अजित पवार गटाची मिंधे गटाबरोबर तडजोड झाली आहे.

निष्ठावंत नाराज

विरोधी पक्षाबरोबर तडजोड करून अजित पवार गटाकडून निवडणूक लढविण्याचे तंत्र अवलंबिले गेल्याने त्यांच्या गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. सध्या अनेकांची अजित पवार स्वतःच्या ‘स्टाईल’ने समजूत काढत आहेत. मात्र, हे एकूणच वातावरण बघता जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाच्या मर्यादा मात्र स्पष्ट झाल्या आहेत. त्यांनी सर्वाधिक नुकसान हे शरद पवार गटाचे केल्याचे दिसून येते

Comments are closed.