चिपळूणमध्ये ठाकरे गटात उभी फूट! भास्कर जाधव नाराज, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा करणार प्रचार


रत्नागिरी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच सर्व काही ठिक नसल्याचं चित्र दिसत आहे. ऐन निवडणुकीत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना मैदानात असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचा ते प्रचार करणार आहेत. भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातील विसंवादामुळे चिपळूणमध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे.

चिपळूण मधील राजकारणात मोठी खळबळ

चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह 24 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र, भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार करणार आहेत. आमच्या पक्षातील उमेदवारांनी अर्ज भरल्याचे मला आज कळाले आहे, अशी माहिती भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं म्हणून मी चिपळूणच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या टप्प्यातील चर्चेत राष्ट्रवादीसोबत जागांच्या वाटाघाटीचा तिढा सोडवून घेतला आहे. त्यानंतर मी नसताना अचानक या चर्चा का थांबल्या ते मला माहीत नाही असे भास्कर जाधव म्हणाले. पण मी आता शब्द दिला असल्याने परिणामांची चिंता न करता रमेश कदम यांचा प्रचार करणार असल्याचे संकेत भास्कर जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळं आता विनायक राऊत यांच्या आदेशानुसार चिपळूनमध्ये उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या प्रचाराकडे भास्कर जाधव पाठ फिरवणार आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील तळवडे गाव चर्चेत

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे राज्यात निवडणुकांचा धुराळा पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील तळवडे या गावाने लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांसमोर एक अनोखी मागणी ठेवली आहे. सध्या ही मागणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. या मागणीसाठी गावात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.  तळवडे या गावाने नेटवर्कच्या मूलभूत सुविधेसाठी थेट मतदानाचा संबंध जोडला आहे. यावेळी गावात सर्वत्र बॅनरबाजी करण्यात आली आहे. गावात फुकट फिरू नका, नेट द्या… मत घ्या!, नेट दिलात तरच वोट…, अशा आशयाचे अनेक बॅनर सध्या गावात झळकत आहेत. आज 5G च्या जमान्यातही तळवडे गाव मोबाईल नेटवर्कपासून पूर्णपणे वंचित आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनोखी शक्कल लढवली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Bhaskar Jadhav : पक्ष-निशाणी चोरली, आता मतदारही चोरले, यापुढे निवडणुका होतील की नाही याबाबत शंका : भास्कर जाधव

आणखी वाचा

Comments are closed.