रंगयात्रा – द फायटिंग टेमरे

>> दुष्यंत पाटील, [email protected]
इंग्रजांचं साम्राज्य वैभवशाली बनवणारी युद्धनौका ‘एचएमएस टेमरे’. या जीर्ण झालेल्या युद्धनौकेला बोटीच्या मदतीने थेम्स नदीतून ओढत नेणारे दृश्य टर्नर नावाच्या इंग्रज चित्रकाराने चितारलं. बदलाची नोंद असणारे हे चित्र अंतर्मुख करणारे आहे.
इंग्रजांनी 1798मध्ये ‘एचएमएस टेमरे’ नावाची एक युद्धनौका बनवली. ही युद्धनौका महाकाय होती. यामध्ये अक्षरशः आग ओकणाऱया तब्बल 98 तोफा बसवलेल्या होत्या. युद्धनौका तयार झाल्यानंतर बरीच वर्षं प्रत्यक्ष युद्धात तिचा वापर झालाच नाही. 1805मध्ये फ्रेंचांनी इंग्रजांवर आक्रमण केलं. समुद्रात हे युद्ध सुरू झालं. खरंतर इंग्रज या युद्धात अडचणीत आले होते, पण ‘एचएमएस टेमरे’नं या युद्धाला कलाटणी दिली. इंग्रजांनी हे युद्ध जिंकलं ते निव्वळ टेमरे युद्धनौकेमुळे. यानंतर इंग्रजांच्या समुद्रावरच्या प्रभुत्वाला कुणीच आव्हान देऊ शकलं नाही. पुढे इंग्रजांचं साम्राज्य वैभवशाली बनवण्यात टेमरेची भूमिका महत्त्वाची होती.
1838मध्ये म्हणजे जवळपास चाळीस वर्षांनी ही युद्धनौका जीर्ण झाल्यानं तिला भंगारात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऐतिहासिक युद्धनौकेचा हा शेवट होता. या युद्धनौकेला एका वाफेवर चालणाऱया छोटय़ा बोटीनं ओढत ओढत थेम्स नदीतून नेण्यात आलं. ही युद्धनौका म्हणजे एक प्रचंड शिडाचं जहाज होतं. तर तिला ओढत नेणारी छोटी बोट म्हणजे तंत्रज्ञानातल्या प्रगतीचं, औद्योगिक क्रांतीचं एक प्रतीक होतं. कर्कश आवाज करत धूर सोडत जाताना ही आकारानं छोटी असली तरी शक्तिशाली होती. ती बोट सोनेरी इतिहास असणाऱया युद्धनौकेला ओढत नेत जाणारं दृश्य बरंच काही सांगत होतं. हे दृश्य टर्नर नावाच्या इंग्रज चित्रकारानं कॅनव्हासवर आपल्या शैलीत दाखवलं.
अत्यंत आवडणारं असं काही जेव्हा जाणीवपूर्वक दूर ठेवावं लागतं तेव्हा जुन्या आठवणींनी आपल्याला एक प्रकारची उदासी जाणवते. अशीच उदासी टर्नरला टेमरे भंगारात जाताना जाणवत होती. टर्नरनं चित्रात आपल्या भावना उतरवण्याचा प्रयत्न केलाय. त्यानं चित्रातलं आकाश खास प्रकारे दाखवलंय. त्यात त्यानं नारिंगी, लाल, फिकट पिवळा आणि जांभळा रंग दाखवलाय. जणू काही हे रंग आपल्याला त्या युद्धनौकेचा तेजस्वी इतिहास सुचवतात. चित्रात युद्धनौकेचा शुभ्र रंग आपल्यावर छाप टाकतो. चित्रात सूर्य मावळताना दिसतोय. सूर्यास्ताचं हे चित्र सुंदर आहेच, पण त्यात एका प्रकारचा उदासपणा जाणवतो. एखादा चांगला दिवस संपत आल्यासारखं हे चित्र पाहताना वाटतं. हा सूर्यास्त टेमरे जहाजाच्या पार्श्वभूमीला असल्यानं युद्धनौकेचं युग संपत आल्याचं सुचतं. चित्रात उगवणाऱया चंद्राची कोरही अस्पष्टपणे दिसते. वाफेवर चालणारी पण शक्तिशाली असणारी छोटीशी बोट आणि आकाशातली चंद्रकोर येणाऱया तंत्रज्ञानाच्या युगाची चाहूल देतात.
चित्रातली टर्नरची शैली आपल्यावर प्रभाव पाडते. तो कॅनव्हासवर चित्र रंगवताना दृश्य जसंच्या तसं दाखवत नाही. आपल्याला चित्रातल्या सगळ्या गोष्टी धूसर दिसतात. त्यानं सगळे तपशील दाखवत हुबेहूब चित्र काढलं असतं तर ते चित्र फोटोसारखं झालं असतं. एखादी घटना बातमीमधून जशीच्या तशी सांगणं आणि काव्यामधून स्वतःच्या शैलीत सांगणं यात जसा फरक असतो, तसाच फरक हुबेहूब चित्रात आणि धूसर चित्रात होता. धूसर चित्रामुळे पाहणारे लोक आपोआप अंतर्मुख व्हायचे. टर्नरच्या बऱयाचशा चित्रांमध्ये समुद्र, निसर्ग दिसतो. या चित्रांमधून टर्नर आयुष्यातल्या खोल प्रश्नांवर भाष्य करायचा. त्यामुळेच तो एकोणिसाव्या शतकातला एक महान चित्रकार म्हणून ओळखला जातो.
आता हे चित्र लंडनमध्ये नॅशनल गॅलरीत आहे. 2005मध्ये बीबीसीनं आयोजित केलेल्या एका पोलमध्ये इंग्रजांनी या ‘देशाचं सर्वात लाडकं चित्र’ म्हणून या चित्राची निवड केली होती. आता तर त्यांच्या 20 पौंडच्या नोटवर हे चित्र आलंय.

Comments are closed.