पाऊलखुणा – धामणीचा लक्ष्मीकेशव

>> आशुतोष बापट, [email protected]

कोकणात शिल्पसमृद्ध मंदिरे फारशी आढळत नसली तरी अत्यंत देखण्या, कलाकुसरयुक्त अशा विविध मूर्ती या कोकणप्रांती मोठय़ा प्रमाणात विखुरलेल्या आहेत. धामणी येथील वाकणकर कुटुंबीयांचे खासगी मंदिर असलेल्या लक्ष्मी-केशव मंदिरातील मूर्तीचे अप्रतिम देखणेपण व मंदिराची कलाकुसर लक्षात राहते.

निसर्गरम्य कोकणात दडलेला खजिना खरे तर अजून कुणालाच सगळा सापडलेला नाही. दिवसेंदिवस एकेक नवनवीन ठिकाणे, काही निसर्गचमत्कार कोकण प्रांत उलगडून दाखवतो आहे. कातळखोदचित्रे हा त्यातलाच एक प्रकार. शिल्पसमृद्ध मंदिरे जरी कोकणात फारशी आढळत नसली तरी अत्यंत देखण्या, कलाकुसरयुक्त अशा विविध मूर्ती या कोकणप्रांती मोठय़ा प्रमाणात विखुरलेल्या आहेत. त्यांचे सौंदर्य, त्यांचे प्राचीनत्व हे किती मोठे आहे, किती किमती आहे याची जाणीव कधी कधी स्थानिक मंडळींना नसते. त्यामुळे हा ठेवा सर्वांसमोर येतही नाही, पण खरोखरच कोकण या अशा सांस्कृतिक खजिन्याने समृद्ध आहे.

या प्रदेशात विष्णू मूर्ती खूप मोठय़ा प्रमाणावर दिसून येतात. शेडवई, सडवे, दिवेआगर, कोळीसरे, बिवली इथल्या विष्णू मूर्ती अत्यंत देखण्या आणि सुंदर आहेत. या सर्व केशवाच्या मूर्ती आहेत. विष्णूला चार हात असतात आणि त्यात शंख-चक्र-गदा-पद्म अशी चार आयुधे असतात. उजव्या खालच्या हातात पद्म, उजव्या वरच्या हातात चक्र, डाव्या वरच्या हातात शंख आणि डाव्या खालच्या हातात गदा असा जर आयुधक्रम असेल तर त्या विष्णू मूर्तीला ‘केशव’ असे म्हटले जाते. अशा केशवाच्या मूर्ती कोकणात प्रामुख्याने सापडतात. श्रीवर्धन इथे असलेली नारायणाची मूर्ती याला अपवाद आहे. तिथे विष्णूच्या हातात असलेल्या आयुधांचा क्रम हा शंख-पद्म-गदा-चक्र असा आहे. हे असे अपवाद सोडले तर प्रामुख्याने कोकणात केशव, विष्णूच्याच मूर्ती आढळतात. त्या विष्णूच्या शेजारी लक्ष्मी असेल तर त्या मूर्तीला लक्ष्मी-केशव असे म्हटले जाते. सर्वसामान्यपणे कोकणात अशा लक्ष्मी-केशवाच्या मूर्ती मोठय़ा संख्येने आहेत.

या केशवाच्या मूर्तींमध्ये अजून एक मूर्ती आढळून आली ती धामणी इथे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरच्या जवळ धामणी नावाचे छोटेखानी गाव आहे. चिपळूणकडून संगमेश्वरकडे जाऊ लागले की, वाटेत राजेवाडी इथे गरम पाण्याचे कुंड आहे. अगदी उकळण्याच्या बेताला आलेले इतके गरम पाणी इथे असते. भवानीगडाच्या पायथ्याला असलेले हे ठिकाण. त्याचाच जवळ एक सुंदर असे दोन मजली गाभारे असलेले सोमेश्वरचे मंदिर आहे. इथे खालच्या गाभाऱयात शिवपिंडी, तर वरच्या गाभाऱयात गणपतीची मूर्ती ठेवलेली दिसते.

धामणी गाव संगमेश्वरच्या आधी जेमतेम तीन कि.मी. इतक्या अंतरावर. गावात गेल्यावर वाकणकर कुटुंबीयांचे घर लागते. त्या घराच्या वरच्या बाजूला प्राकारभिंतीने बंदिस्त असलेले मंदिर नजरेस पडते. हेच ते लक्ष्मी-केशवाचे मंदिर. मंदिराचा प्राकार खूपच प्रशस्त असा आहे. हे मंदिर वाकणकर कुटुंबीयांचे खासगी मंदिर आहे. दगडी कमानीतून आत गेल्यावर समोरच दगडात बांधलेले आणि काहीसे निराळे शिखर असलेले मंदिर दिसते. मंदिरात पायऱया चढून गेल्यावर आधी सभामंडप आणि आत गाभारा अशी रचना. गाभाऱयात सुंदर अशी काळ्या पाषाणातील केशवाची अंदाजे 4 फूट उंचीची मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. पद्म-शंख-चक्र-गदा असा आयुधक्रम असलेली केशवाची सुंदर मूर्ती इथे विराजमान आहे. कोकणात दिसणाऱया इतर मूर्तींसारखी या मूर्तीवरसुद्धा दगडात कोरलेले विविध अलंकार पाहायला मिळतात. गळ्यात ऐकवली, फलकहार, डाव्या खांद्यावरून खाली येणारे यज्ञोपवित तसेच वैकक्षक हा दागिना.

मूर्तीच्या डोक्यावर किरीटमुकुट, कानात मकरकुंडले. केशव म्हणजे लक्ष्मीचा पतीच. त्यामुळे तोसुद्धा समृद्ध, संपन्न असणार. त्यामुळेच संपन्नतेचे प्रतीक असलेला त्रिवलयांकित गळा हे या मूर्तीचे अजून एक खास वैशिष्टय़ म्हणायला हवे. लक्ष्मीची केशरचना फारच आकर्षक आहे. तिच्या केसांची वेणी तिच्या डोक्यावरून डाव्या बाजूला खांद्यापर्यंत आलेली आहे. प्रभावळीमध्ये दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या देखणेपणापुढे दशावतारांचे शिल्पांकन काहीसे डावे वाटते. मूर्ती अंदाजे इ.स. च्या 14 व्या शतकाच्या उत्तरार्धातील असावी असे वाटते. दशावतारात कोरलेला नृसिंह हा अगदी वेगळा असा केवल नरसिंह आहे. तो उभा दाखवलेला असून त्याच्या उजव्या हातात कमाल, तर डाव्या हातात चक्र धारण केलेले आहेत. नरसिंहाच्या गळ्यात जानवे असून त्याने गुडघ्यापर्यंत येणारे धोतर नेसलेले दिसते. नरसिंहाचे काहीसे वेगळे असे रूप इथे पाहायला मिळते.
इतकी सुंदर मूर्ती एवढय़ा कोकणातल्या भटकंतीमध्ये बघायची राहून गेली होती. तेथील श्री. पेंडसे आणि श्री. वाकणकर यांच्या सहकार्यामुळे अगदी बारकाईने या मूर्तीचे निरीक्षण करता आले. या मंदिराच्या संबंधीचा सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वाकणकर कुटुंबीयांना एक सनद दिलेली आहे. ब्रिटिश सरकारने या सनदेचे नूतनीकरण केल्याचे पत्रसुद्धा त्यांच्याकडे आहे. महामार्गापासून इतक्या जवळ असलेले तितकेच देखणे असे श्री लक्ष्मी-केशवाचे रम्य देवस्थान आणि त्यात विराजमान झालेली केशवाची देखणी मूर्ती कोकणच्या वैभवात अजूनच भर घालते आहे.

Comments are closed.