काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची संख्या वाढली आहे

इस्लामाबाद:

पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताच्या विरोधात केलेल्या ‘सिंदूर’ अभियानाचा सूड घेण्यासाठी पाकिस्तान आसुसला आहे. भारतात आणि विशेषत: काश्मीरमध्ये व्यापक प्रमाणात दहशतवादी हल्ले करण्याची तयारी त्याने चालविलाr असून जम्मू-काश्मीरमध्ये सावधानता बाळगावी लागेल, असा इशारा भारताच्या गुप्तचर संस्थानी दिला आहे. काश्मीरमध्ये हिंवाळ्याचा पूर्णत: प्रारंभ होण्यापूर्वीच तेथे धमाके करण्याची पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांची योजना आहे. या योजनेला पाकिस्तानच्या लष्करी प्रशासनाचीही पाठिंबा आहे. त्यामुळे भारताने आपली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे, असे गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता सक्रीय दहशतवाद्यांची संख्या वाढली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी खोऱ्यात केवळ 56 पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कार्यरत होते. आता ही संख्या वाढून 131 इतकी झाली आहे. या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानचे 122 दहशतवादी असून जम्मू-काश्मीरच्या स्थानिक दहशतवाद्यांची संख्या केवळ 9 आहे. हे 9 दहशतवादीही पाकिस्तानकडून प्रशिक्षण घेतलेले आणि त्याच्या संपर्कात असलेलेच आहेत. 2023 मध्ये 60 तर 2024 मध्ये 61 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

 

Comments are closed.