तृणमूलचे आमदार हुमायून कबीर यांचे वादग्रस्त विधान

बाबरीसंबंधी वक्तव्य, अटक करण्याची मागणी

वृत्तसंस्था / कोलकाता

अयोध्येत श्रीरामध्वजाच्या आरोहणासाठी सज्जता केली जात असतानाच. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने बाबरी मशिदीच्या संदर्भात  वादग्रस्त  विधान केल्याने संतापाची लाट उसळली आहे. या आमदाराला त्वरित अटक करावी आणि त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. अनेक हिंदू संघटनांनी या विधानाचा तीव्रपणे निषेध केला आहे. येत्या 6 डिसेंबरला पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशिदीची कोनशीला स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा हुमायून कबीर या आमदाराने केली असून त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बाबरी मशिद ही मुस्लीम आक्रमकांनी हिंदूंचा अवमान करण्यासाठी, रामजन्मभूमीस्थानावर उभी केली होती, अशी सार्वत्रिक भावना आहे. याच भावनेमुळे 6 डिसेंबर 1992 या दिवशी अयोध्येत करसेवेसाठी जमलेल्या लक्षावधी करसेवकांनी बाबरी मशिदीचे पतन घडविले होते. ही मशिद पुन्हा कोठेही उभी राहता कामा नये, अशी असंख्य हिंदूंची इच्छा आहे. रामजन्मभूमीस्थान हे हिंदूंच्या आधीन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये दिला होता. त्यानंतर रामजन्मभूमीस्थानी भव्य राममंदिराच्या निर्माणकार्याचा प्रारंभ करण्यात आला होता. या मंदिरावर येत्या मंगळवारी श्रीरामध्वजाचे आरोहण होणार आहे. अशा स्थितीत पुन्हा बाबरी मशिदीची स्थापना केली जाईल, हे तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचे विधान हिंदूंच्या भावना हेतुपुरस्सर भडकविण्यासाठी केले गेले आहे, असा आरोप केला जात असून कबीर याला त्वरित अटक करा, अशी मागणी होत आहे.

आचार्यांकडून निषेध

अयोध्येचे जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी कबीर याच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. हे विधान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निर्णयामुळे राममंदिराचा प्रश्न आता संपला आहे. अशा स्थितीत पुन्हा बाबरी मशिदीच्या उभारणीची भाषा करणे हे न्यायालयाचा अवमान करणारे कृत्य आहे. तसेच, हे राष्ट्रीय एकात्मतेला संकटात टाकणारे विधान असल्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

1 कोटीचे पारितोषक

आमदार हुमायून कबीर यांना संपविणाऱ्याला 1 कोटीचे पारितोषिक देण्यात येईल, असा इशाराही आचार्य परमहंस यांनी दिला आहे. भारतात कोठेही कोणत्याही परकीय आक्रमाच्या नावाने एक वीटही उभारली गेली तरी त्याचा गंभीर परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला. परमहंस यांच्या या विधानांवर तृणमूल काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून अशा विधानांमुळे देशातील वातावरण बिघडेल असा इशारा दिला. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे अयोध्येत श्रीरामध्वजारोहण सोहळ्याला बळकट सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुस्लीम मान्यवरांकडूनही निषेध

हुमायून कबीर यांच्या विधानाचा निषेध काही मुस्लीम मान्यवरांनीही केला आहे. अयोध्या प्रकरणातले एक महत्वाचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी कबीर यांचे विधान भावना भडकाविणारे आणि शांततेचा भंग करणारे असल्याचा आरोप केला. धार्मिक मुद्द्यांपासून राजकारण्यांनी दूर रहावे. राजकीय नेत्यांमुळे समाजांमध्ये भांडणे लागत आहेत, समाजाची घडी विस्कटत आहे, असा आरोप त्यांनी केला.

Comments are closed.