IND vs SA: वनडे मालिकेसाठी ऋषभ पंतला कर्णधार का करण्यात आलं नाही? जाणून घ्या मोठं कारण समोर
यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार असेल. रविवारी बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. अनुभवी अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) तब्बल आठ महिन्यांनंतर वनडे संघात पुनरागमन करत आहे. नियमित कर्णधार शुबमन गिलला (Shubman gill) कोलकात्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीदरम्यान मानेला दुखापत झाल्याने तो मालिकेतून बाहेर झाला, आणि त्यामुळे राहुलला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली.
वनडे उपकर्णधार श्रेयस अय्यरदेखील (Shreyas iyer) दुखापतीमुळे उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत अशी शक्यता होती की, गुवाहाटी कसोटीमध्ये टीम इंडियाची धुरा सांभाळणारा कसोटी उपकर्णधार ऋषभ पंतला वनडेमध्ये कर्णधार बनवले जाऊ शकते.
परंतु निवड समितीने शेवटी केएल राहुलच कर्णधार ठेवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्रेस रिलीजमध्ये या मालिकेसाठी उपकर्णधार कोण आहे, हे स्पष्ट केलेले नाही. मात्र रिपोर्टनुसार, राहुलच्या उपकर्णधाराची भूमिका पंत निभावण्याची शक्यता आहे.
ही एक लहान मालिका असल्याने नेतृत्वाची जबाबदारी राहुलला देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले, राहुलला एकदाच कर्णधारपद देण्यात आले आहे, आणि ते तसंच पाहायला हवं. ऋषभ पंतचा विचारच केला गेला नाही, कारण गेल्या एका वर्षात त्याने फक्त एकच वनडे खेळला आहे. निवडकर्त्यांना अपेक्षा आहे की, शुबमन गिलची मान दुखापत लवकर बरी होईल आणि तो जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत परत येईल.
Comments are closed.