मुंबईची हवा बिघडली, चिंता आणखी वाढली; गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत

दिल्लीपाठोपाठ मुंबईची हवासुद्धा विषारी बनली आहे. रविवारी सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 210 अंकांच्या पातळीवर गेला. हा निर्देशांक गंभीर श्रेणीत गेल्याने मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची चिन्हे असून प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
गेल्या आठवडय़ात मुंबई शहर आणि उपनगरात थंडीची तीव्रता वाढली. सलग चार दिवस तापमान 16 ते 17 अंशाच्या आसपास राहिले. त्यातच वातावरणातील प्रदूषित घटकांमुळे हवा बिघडली आहे. रविवारी सकाळी उपनगरातील तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअसच्या आसपास असूनही प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांना जड आणि अस्वस्थ वाटत होते. पहाटेपासूनच सर्वत्र धुके पसरल्याने आकाश निस्तेज व अस्पष्ट दिसत होते. सूक्ष्म कणांचे उच्च प्रमाण हवेत असल्याचे तज्ञांचे म्हणणे असून प्रामुख्याने मालाड, बोरिवली, देवनार, वरळी आणि माझगावची हवा वाईट श्रेणीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दोन दिवसांपूर्वी हा निर्देशांक 160 इतका नोंदवला गेला होता. आता मात्र त्यात झपाटय़ाने वाढ झाली असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक 210 अंकांच्या पातळीवर गेला आहे.
मुंबईतील बांधकाम, वाहनांमधून निघणारा धूर, रात्रीच्या वेळी करण्यात येणाऱ्या शेकोटय़ा तसेच मुंबईतील कारखान्यांमधून निघणारा धूर वायुप्रदूषणाला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईच्या तापमानात हळूहळू वाढ होत असतानादेखील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होताना दिसत नाही.

Comments are closed.