अचानक हृदयविकाराचा झटका का आला? स्मृतीच्या वडिलांबाबत डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
अचानक आलेल्या वैयक्तिक कारणामुळे विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिचं लग्न थांबवण्यात आलं आहे. रविवारी 23 नोव्हेंबरला होणारा तिचा आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह विधी काही तासांवर आला असताना स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक हृदयविकाराची लक्षणं दिसू लागली. त्यामुळे सुरू असलेला सगळा सोहळा तत्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सांगलीतील समडोळी रोडवरील फार्महाऊसमध्ये तीन दिवसांपासून समारंभांची रेलचेल सुरू होती. हळद, संगीत असे कार्यक्रम रंगात आले होते. टीम इंडियातील जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयांका पाटील, शेफाली वर्मा आणि रेणुका सिंह अशा जवळच्या सहकाऱ्यांनीही स्मृतीच्या हळदीचा आनंद साजरा केला होता.
अचानक आलेल्या त्रासानंतर श्रीनिवास मानधना यांना सार्व्हित हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. माध्यमांशी बोलताना डॉ. नमन शाह पुढे म्हणाले, “स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना सकाळी 11.30 च्या सुमारास छातीत डावीकडे दुखू लागलं होतं. ही हृदयविकारासारखीच लक्षणं होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना सार्व्हित हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या हृदयातील एन्झाइम्स किंचित वाढले असले तरी त्यांना सतत निरीक्षणाची आवश्यकता आहे. आमचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रोहन ठाणेदार यांनीही त्यांची तपासणी केली आहे. इकोकार्डिओग्रामवर कोणतेही नवीन निष्कर्ष नाहीत. परंतु त्यांना सतत ईसीजी देखरेखीची आणि आवश्यक असल्यास अँजिओग्राफीची गरज असू शकते. सध्या त्यांचा रक्तदाब थोडा वाढला आहे. म्हणून त्यांना सतत देखरेखीची आवश्यकता आहे. हे शारीरिक आणि मानसिक ताणामुळे असू शकतं.”
दरम्यान, लग्न सोहळा आयोजित करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक तोहीन मिश्रा यांनी कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याची अधिकृत माहिती दिली.
Comments are closed.