Winter Health: तुम्हालाही इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते? तज्ञांनी सांगितली गंभीर कारणं, वेळीच उपाय महत्त्वाचे
बहुतांश वेळा अनेकांना हिवाळ्यात जास्त थंडी जाणवते. मात्र जर तुम्हाला जास्त थंडी सहन होत नसेल तर ते तुमच्या शरीरात व्हिटॅमिनच्या कमतरतेचे संकेत असू शकतात. तज्ञांच्या मते, एखाद्याचे हात- पाय सतत गारठलेले असतील, जास्त थंडी जाणवत असेल तर शरीरात लोह आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता हे त्यामागचे कारण असू शकते. असं असेल तर त्यावर उपाय काय? ही कमतरता भरून काढण्यासाठी काय खावं? हे पाहूया… ( Reasons of feeling more cold in winter )
लोह लोटसर कमळ
तज्ञांच्या मते, लोहाची कमतरता हे जास्त थंडी वाजण्यामागचं सर्वात प्रमुख कारण असू शकतं. लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होते, ज्यामुळे रक्तप्रवाहात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. यामुळे चयापचय मंदावते आणि शरीरात कमी उष्णता निर्माण होते. यामुळे काही लोकांना थकवाही जास्त जाणवतो. त्यामुळे लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात पालक, चणे, गूळ आणि खजूर यासारखे पदार्थ समाविष्ट करा.
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता
रक्त निर्मिती आणि ऑक्सिजन पुरवठ्यात व्हिटॅमिन बी १२ महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीराची उष्णता निर्माण करण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे हातपाय थंड होतात. तसेच हात- पायांना सतत मुंग्या येणे, थकवायासारखी लक्षणे देखील दिसतात. दूध, दही, पनीर, चीज, अंडी आणि मांसाहारी पदार्थ (चिकन, मासे, लाल मांस) हे बी१२ चे चांगले स्रोत आहेत. गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक आहार घ्यावा.
हायपोथायरॉईडीझम (थायरॉईडची कमतरता)
अचानक जास्त थंडी वाजण्याचे हे सर्वात सामान्य आणि गंभीर कारण आहे. थायरॉईड हार्मोन शरीरातील चयापचय नियंत्रित करते. त्याच्या कमतरतेमुळे शरीराचे तापमान असंतुलित होते. ज्यामुळं वजन वाढणे, केसगळती, थकवा आणि जास्त थंडी जाणवते. यावर उपाय म्हणजे आयोडीन आणि सेलेनियम आवश्यक आहेत. आयोडीनयुक्त मासे, दही, चीज, ब्राझील नट्स, सूर्यफूल बियाणे आणि बाजरी यासारखे पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार थायरॉईडवरील औषधे घेणे देखील महत्त्वाचे आहे.
वरील कारणं ही गंभीर ठरू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला जास्त थंडी वाजत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच लोह, बी१२ आणि थायरॉईड सारख्या महत्त्वाच्या रक्त चाचण्या करून घ्या. त्यामुळे पटकन उपचार घेण्यास मदत होते.
Comments are closed.