गर्भवती भावजयीची कुऱ्हाडीने हत्या; दिरावर 24 वर्षांनी झडप

नऊ महिन्यांच्या गर्भवती भावजयीची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या करणाऱ्या दिराला नेरळ पोलिसांनी तब्बल 24 वर्षांनी बेड्या ठोकल्या. ही घटना तालुक्यातील कळंब पोही या गावात 2 फेब्रुवारी 2001 मध्ये घडली होती. तेव्हापासून आरोपी संतोष राणे हा फरार होता. तो पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथे संतोष पाटील या नावाने वावरत कॅटरर्सचा व्यवसाय करीत होता. पोलिसांनी जोरदार फिल्डिंग लावून त्याच्या मुसक्या आवळल्या.

कळंब पोही गावातील रहिवासी अनिल राणे हे 2 फेब्रुवारी 2001 रोजी वीटभट्टीवरील काम आटोपून घरी पोही येथे परतले असता त्यांची गर्भवती पत्नी रक्ताच्या थारोळ्यात मृत आढळली. त्यावेळी आरोपी संतोष राणे याचा कौटुंबिक कारणावरून भावजयीसोबत वाद झाला होता. संतापाच्या भरात आरोपीने घरातील कुऱ्हाड उचलून मानेवर, डोक्यावर, हातावर आणि दंडावर सलग घाव घालून भावजयीची हत्या केली होती. ही महिला नऊ महिन्यांची गर्भवती असल्याने हे दुहेरी हत्याकांड ठरले होते. घटनेनंतर आरोपी तत्काळ गाव सोडून फरार झाला. गेल्या दोन दशकात आरोपीचा माग काढण्यासाठी अनेक अधिकारी प्रयत्नशील होते. मात्र आरोपी आपले राहते ठिकाण, नाव आणि रोजगार वारंवार बदलत असल्याने त्याचा शोध लागत नव्हता. अखेर नेरळ पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी या जुन्या गुन्ह्याचा तपास नव्याने हाती घेतला होता.

Comments are closed.