न्यायमूर्ती सूर्यकांत 53 वे सरन्यायाधीश शपथ

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सोमवारी (२४ नोव्हेंबर) देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूर्यकांत यांना पदाची शपथ दिली. सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी (२३ नोव्हेंबर) निवृत्त झाले. आता न्यायमूर्ती सूर्यकांत पुढील 15 महिन्यांसाठी सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. सूर्यकांत 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत सरन्यायाधीशपदावर राहतील.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कलम 370 हटवणे, भाषण स्वातंत्र्य आणि नागरिकत्व अधिकार यांच्याशी संबंधित खटल्यांच्या सुनावणीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा शपथविधी सोहळा ऐतिहासिक ठरला आहे. या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे सरन्यायाधीश उपस्थित होते. भूतानचे मुख्य न्यायाधीश लियोनपो नोरबू शेरिंग, मॉरिशसच्या मुख्य न्यायाधीश बीबी रेहाना मुंगली-गुलबुल, मलेशियाच्या फेडरल कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश नलिनी पथमनाथन, केनियाच्या मुख्य न्यायाधीश मार्था कुम, नेपाळचे मुख्य न्यायाधीश प्रकाश मानसिंग राऊत उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यात उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही उपस्थित होते.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरियाणातील हिसार येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1981 मध्ये त्यांनी सरकारी महाविद्यालय, हिसारमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 1984 मध्ये, त्यांनी महर्षि दयानंद विद्यापीठ, रोहतक येथून कायद्याची पदवी पूर्ण केली आणि हिसारच्या जिल्हा न्यायालयात कायद्याचा सराव सुरू केला.
1985 मध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात कायद्याचा सराव करण्यासाठी चंदीगडला गेले. तेथे त्यांनी घटनात्मक, सेवा आणि नागरी विषयात प्राविण्य मिळवले. 2004 मध्ये त्यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी 5 ऑक्टोबर 2018 ते मे 2019 पर्यंत हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले.
24 मे 2019 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती झाली. 12 नोव्हेंबर 2024 पासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत आणि आता शपथ घेतल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले आहेत.
हे देखील वाचा:
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा चीफ ऑफ स्टाफ हैथम अली तबताबाई मारला गेला
पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना अटक
पेशावरमधील पाकिस्तानच्या निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला: गोळीबार, दोन स्फोट आणि तीन ठार
Comments are closed.