पंजाबमधून आलेला तरुण कसा झाला बाॅलीवूडचा हीमॅन, वाचा
बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. पवनहंस जुहू येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकीर्द नेहमी संस्मरणीय राहील. त्यांचा सुपरस्टार होण्याचा हा प्रवास सोपा नव्हता. वाटेत येणाऱ्या असंख्य अडथळ्यांमधून वाट काढत धर्मेंद्र सर्वांचे आवडते अभिनेता बनले. इंडस्ट्रीत रिकाम्या हाताने आलेल्या कलाकाराने अल्पावधीत लाखो रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. त्यांची संघर्षाची कथा ही सर्वांसाठीच प्रेरणादायी असेल.
धर्मेंद्र हे पंजाबमधील एका जाट कुटुंबातील होते. फिल्मफेअर स्पर्धेत निवड झाल्यानंतर ते मुंबईत आले होते. ते मुंबईत आले तेव्हा, राहण्याचा काहीच ठावठिकाणा नव्हता. एकवेळचे अन्न खाण्याचीही ददात असणारे धर्मेंद्र यांनी काही दिवसांतच स्वतःचे स्थान मिळवले. गाठीशी भरपूर स्वप्नं घेऊन आलेल्या या अभिनेत्याने त्यांच्या मुलाखतीत संघर्षांबद्दल सांगितले. करिअरची सुरूवात आणि त्यानंतर चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल सांगताना ते भावूक झाले होते.
सिंगिंग रिअॅलिटी शोच्या मंचावर धर्मेंद्र यांनी याबाबत सांगितले होते. ते म्हणाले की “माझे मुंबईत घर नव्हते. त्यामुळे मी त्यावेळी गॅरेजमध्ये झोपायचो. जरी माझे घर नसले तरी मला नेहमीच पैसे कमवण्याची इच्छा होती. पैसे कमवण्यासाठी मी एका ड्रिलिंग फर्ममध्ये पार्ट टाईम काम करू लागलो. त्यावेळी मला या कामाचे 200 रुपये मिळाले.”असे त्यांनी सांगितले होते.
पुढे ते म्हणाले की, मी शाळेत असताना शाळा सुटल्यावर एका पुलाजवळ बसायचो. तिथे बसून मी माझ्या भविष्याबद्दल विचार करायचो. आता, जेव्हा मी तिथे जातो तेव्हा मला फक्त एकच आवाज ऐकू येतो आणि तो म्हणजे धर्मेंद्र… तू अभिनेता झाला आहेस.”असे ते म्हणाले.
धर्मेंद्र यांनी एकदा एका मुलाखतीत त्यांच्या प्रवासाबाबत अनेक किस्से सांगितले. ते म्हणाले पंजाबहून त्यांच्यासोबत एक मित्र मुंबईत आला होता. तेव्हा ते रेल्वे क्वार्टरमध्ये बाल्कनीत भाड्याने राहत होते. या काळात काम नसल्याने, पैसे नसायचे मग ते अनेक रात्री उपाशी झोपायचे. अनेक दिवस कामासाठी वणवण केल्यानंतर 1960 मध्ये अर्जुन हिंगोरानी यांच्या “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती, असे ते म्हणाले.
पहिला चित्रपट मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. धर्मेंद्र यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. “हकीकत,” “फूल और पत्थर,” “समाधी,” “ब्लॅकमेल,” “शोले,” “प्रोफेसर प्यारेलाल,” “रझिया सुलतान,” “पोलिसवाला गुंडा,” “यमला पगला दीवाना,” आणि “आपले” यांसारख्या बहुचर्चित चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयाने कायमची छाप सोडली.
‘वीरूची एक्झिट’.. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Comments are closed.