मुंबईत ‘पाताल लोक’ तयार करण्याचा प्लान – मुख्यमंत्री फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासावर बोलताना मुंबईत ‘पाताल लोक’ तयार करण्याचा प्लान असल्याची घोषणा केली आहे. ‘पाताल लोक’ (Paatal Lok) ही एका ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय हिंदी थ्रिलर वेब सिरीज आहे. भाजपच्या युथ कनेक्ट कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे जगभरातील लोक मुंबईत येत असतात. अशा वेळी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, रस्त्यांप्रमाणेच बोगद्यांचे एक मोठे जाळे उभारले जाईल, असे फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केले आहे.
ते म्हणाले, ‘वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आम्ही संपूर्ण मुंबईत ‘पाताल लोक’ तयार करण्याचा प्लान करत आहोत. यामध्ये बोगद्यांचे एक मोठे जाळे उभे केले जाणार आहे’.
फडणवीस म्हणाले, ‘हे सध्याच्या रस्त्यांना समांतर असे जाळे असेल आणि मेट्रो कॉरिडॉर या योजनेला पूरक ठरतील’.
तसेच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बोरीवली आणि गोरेगाव दरम्यानचा समांतर रस्ता आणि पुढील वर्षी अपेक्षित असलेला वरळी-शिवडी कनेक्टर, अटल सेतूपासून (Atal Setu) वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंत वाहतूक सुलभ करेल.
वांद्रे ते बीकेसी पर्यंत प्रस्तावित असलेला बोगदा विमानतळावर पोहोचणे सुलभ करेल, असेही त्यांनी पुढे नमूद केले. तसेच मुंबईत सध्या गर्दीच्यावेळी वाहनांचा वेग ताशी 20 किमी इतका असतो तर कधी तो ताशी 15 किमी इतक्यावर पोहोचतो. हा वेग ताशी 80 किमी वर नेण्यासाठी पायाभूत सुविधा जसे की रस्ते, बोगदे, पूल आणि जल वाहतुकीसारखे पर्याय देखील प्रत्यक्षात आणण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला.

Comments are closed.