वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
गुवाहाटी:भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी गुवाहाटी येथे सुरु आहे. या कसोटीत दक्षिण आफ्रिका भक्कम स्थितीत असून भारतावर सामन्यात पराभवाचं संकट कायम आहे. रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया बॅकफूटवर पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 489 धावा केल्या. तर, भारताचा पहिला डाव 201 धावांवर आटोपला. यामुळं पहिल्या डावातच दक्षिण आफ्रिकेला 288 धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात बिनबाद 26 धावा केल्या असून त्यांच्याकडे आता 314 धावांची आघाडी आहे.
Ravi Shastri : रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
गुवाहाटी कसोटीत पहिल्या डावात भारताचे फलंदाज अपयशी ठरले. अपवाद फक्त यशस्वी जयस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघे होते. मार्को जेनसन यानं 6 विकेट घेतल्यानं भारताचा डाव 201 धावांवर आटोपला. भारताचे गोलंदाज, फलंदाज अपयशी ठरत आहेत त्यामुळं संघनिवडीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गौतम गंभीरच्या काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शास्त्री म्हणाले वॉशिंग्टन सुंदर यानं कोलकाता कसोटीत फक्त एक ओव्हर गोलंदाजी केली होती तेव्हा त्याला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. भारतानं त्या कसोटीत चार फिरकी गोलंदाज खेळवले होते तिथं त्याला गोलंदाजी दिली नव्हती असंच म्हणावे लागेल.
रवि शास्त्री म्हणाले अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर एकाच्या जागेवर अतिरिक्त फलंदाजाला संधी दिली पाहिजे. कोलकाता कसोटीत एका स्पिनरनं एकच ओव्हर गोलंदाजी केली असेल तर तिथं एका अतिरिक्त फंलदाजाला संधी द्यायला हवी होती.
कोलकाता कसोटीत त्याला तिसऱ्या स्थानावर पाठवलं होतं तर त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. शुभमन गिल दुखापतग्रस्त असल्यानं साई सुदर्शन संघात आला. त्यामुळं सुंदर चौथ्या स्थानावर फलंदाजी करु शकला असता. सुंदरनं कोलकाता कसोटीत भारताकडून दोन्ही डावात मिळून सर्वाधिक 60 धावा केल्या होत्या. त्यानंतरही त्याला आठव्या स्थानावर पाठवलं गेलं. वॉशिंग्टन सुंदर चौथ्या स्थानावर सहजपणे खेळू शकला असता, तो आठव्या स्थानाचा फलंदाज नाही, असं शास्त्री म्हणाले. वॉशिंग्टन सुंदरनं गुवाहाटी कसोटीच्या पहिल्या डावात 48 धावा केल्या आहेत.
दरम्यान, भारताला न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका मायदेशात गमवावी लागली होती. त्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतानं वेस्ट इंडिजला 2-0 असं पराभूत केलं होतं. मात्र,आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावण्याचं संकट निर्माण झालं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.