आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण
गुवाहाटी: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी गुवाहाटीत सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 489 धावा केल्या. तर, भारताचा पहिला डाव 201 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेला यामुळं पहिल्या डावात 288 धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीतील विजयासह भारताचा 2-0 असा सुपडा साफ करण्याच्या जवळ आहे. दुसऱ्या डावातील 26 धावांसह दक्षिण आफ्रिकेकडे एकूण 314 धावांची आघाडी आहे. भारताचा या कसोटीत पराभव झाल्यास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर होऊ शकतो.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुणतालिकेत कोण कुठं?
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. त्यांनी सर्व सामने जिंकले आहेत. डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत गुणांच्या टक्केवारीच्या आधारे संघांना रँकिंग दिलं जातं. पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया 100 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहे. तर, दक्षिण आफ्रिका 66.67 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानी श्रीलंका 66.67 टक्के गुणांसह आहे. भारत 54.17 टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे.
पाकिस्तान पाचव्या, इंग्लंड सहाव्या, बांगलादेश सातव्या स्थानावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या 2025-27 च्या सायकलमध्ये वेस्ट इंडिजचा 5 सामन्यात पराभव झाल्यानं त्यांनी खातं उघडलं नसून ते आठव्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडनं आतापर्यंत एकही मॅच खेळलेली नाही.
भारताचा पराभव झाल्यास पाकिस्तानला फायदा
दुसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाल्यास त्याचा फायदा पाकिस्तानला होऊ शकतो. भारताचा गुणे 48. 47 टक्के होतील. त्यामुळं पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचेल. त्यांचे गुण 50 टक्के आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून मालिका पराभूत झाल्यास भारत पाचव्या स्थानी जाईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसरं स्थान भक्कम करेल. जर त्यांनी गुवाहाटी कसोटी जिंकली तर त्यांचे गुण 75 वर पोहोचतील.
भारत WTC फायनलमध्ये कसं पोहोचणार?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची गुवाहाटी कसोटी भारतानं गमावल्यास भारताचा मार्ग खडतर होऊ शकतो. 2025-27 सायकलमध्ये भारताच्या एकूण 9 कसोटी शिल्लक राहिल्या आहेत. राहिलेल्या 9 पैकी 8 कसोटी मॅचमध्ये भारतानं विजय मिळवल्यास गुण 70 टक्क्यांपर्यंत पोहोचतील. यापूर्वीच्या तीन फायनल पाहिल्या असता फायनलमध्ये जाणाऱ्या संघाची सरासरी 64-68 इतकी राहिले आहे.त्यामुळं भारतानं आगामी 8 कसोटी सामने जिंकल्यास ते अंतिम फेरीत पोहोचू शकतात.
भारत मॅच वाचवणार?
गुवाहाटी कसोटीत दक्षिण आफ्रिका चौथ्या दिवशी सुरुवातीच्या सत्रात आक्रमक फलंदाजी करुन भारतापुढं मोठं आव्हान ठेवू शकते. राहिलेल्या दोन दिवसात भारताच्या गोलंदाजांना आणि फलंदाजांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. तरच गुवाहाटी कसोटी ते वाचवू शकतात.
आणखी वाचा
Comments are closed.