मतदार यादीतील गेंधळ दूर करा! हरकतींसाठी 21 दिवस द्या… अन्यथा निवडणूक रद्द करा! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मागणी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी बनवण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीत गंभीर त्रुटी आणि गोंधळ आहे. निवडणुका पारदर्शक होण्यासाठी मतदार यादीमधील दोष दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे पत्राद्वारे केली. मतदार यादीवर हरकती नोंदवण्यासाठी किमान 21 दिवस द्या, अन्यथा निवडणुका रद्द करा, असेही या पत्रात ठणकावले आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना आणि मनसे नेत्यांनी निवडणूक आयुक्त वाघमारे यांची भेट घेऊन त्यांना हे पत्र सुपूर्द केले. निर्दोष मतदार यादी दिली जाईल असे सांगूनही निवडणूक आयोगाने यादीत त्रुटी कायम ठेवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे की खेद व्यक्त करावा हेच कळत नाही, असा टोला लगावतानाच यादीमध्ये असलेले घोळ या पत्रामधून सविस्तरपणे निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने शेवटची मतदार यादी 30 ऑक्टोबर 2014 रोजी प्रकाशित केली होती. त्यानंतर ती प्रकाशित झाली नाही. आयोगाच्या नियमाप्रमाणे दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात यादी प्रसिद्ध होते आणि त्यानंतर दर तीन महिन्याला सुधारित यादी प्रसिद्ध होते. परंतु चालू वर्षात तसे हेतुपुरस्सर करण्यात आले नसेल तर त्याचे कारण काय, असा सवाल पत्रात विचारण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नवीन सुधारित यादीमध्ये नमूद मतदार स्त्राr आहेत की पुरुष? आणि त्यांचा पत्ता काय याचा कोणताही तपशील देण्यात आलेला नाही याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना भेटले होते तेव्हा त्यांनी कोणत्याही त्रुटींशिवाय याद्या प्रसिद्ध करू आणि शिष्टमंडळाच्या सूचनांचे पालन करू असे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा सवालही पत्रात करण्यात आला आहे.
यादीवर हरकती घ्यायला आठ दिवसच का दिले?
निवडणूक आयोगाने 13 महिने मतदार याद्याच प्रसिद्ध केल्या नाहीत. 6 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणारी मतदार यादी उशिराने 20 नोव्हेंबरला का प्रसिद्ध केली? त्यावर हरकती घ्यायला 8 दिवसच का दिले? याद्या एडिटेबल फॉरमॅटमध्ये का नाहीत? असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले.
तुमच्या नरडीला नख लावतील!
आयोग कामात प्रामाणिक नाही हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. आयोग स्वतःला स्वायत्त यंत्रणा म्हणवतो, मग ती स्वायत्तता दाखवाच, पाठीचा कणा ताठ ठेवून त्या स्वायत्ततेतून येणारी शक्ती सत्ताधाऱयांना दाखवा, असे आवाहनही पत्रात करण्यात आले आहे. आज कोणाच्या तरी मागे घरंगळत जाताना तुम्हाला छान वाटेल… पण ज्यांच्यामागे तुम्ही घरंगळत जात आहात, ती लोकं उद्या तुमच्या नरडीला नख लावतील तेव्हा तुम्हाला कळेल, असा सावधगिरीचा इशाराही देण्यात आला आहे.
21 दिवस द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा!
चुका निवडणूक आयोगाने करायच्या आणि त्या दाखवणाऱयाकडेच पुरावे मागायचे अशा आयोगाच्या भूमिकेवरही पत्रात बोट ठेवले गेले आहे. दुबार मतदार नाहीत असे सांगणाऱया निवडणूक आयोगाने जवळपास 10 लाख दुबार मतदार आहेत असे मान्य केले आहे. मग त्या दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी 7 ते 8 दिवस कसे पुरतील? त्यासाठी किमान 21 दिवस द्या नाहीतर निवडणूक रद्द करा आणि पुन्हा सर्व याद्या सुरळीत करून निवडणुका घ्या, अशी मागणी पत्रात केली गेली आहे. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱयास एकत्रित आक्षेप घेण्याची मुभा द्या, असेही नमूद करण्यात आले आहे.
आता मतदारही पळवायला सुरुवात झाली का?
मतदार याद्यांवर अभ्यास करून आक्षेप नोंदवायचे तर त्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने किचकट करून ठेवली आहे. अनेक ठिकाणी एका वॉर्डमधले मतदार आणि इमारतीही दुसऱया वॉर्डमध्ये टाकण्यात आल्या आहेत. सध्या सत्ताधारी पक्ष उमेदवार पळवत आहेत, त्यातून प्रेरणा घेऊन आता मतदार पण पळवायला सुरुवात झाली आहे का, असा खोचक सवालही पत्रात करण्यात आला आहे.
Comments are closed.