नवे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी घेतली शपथ
राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात देवविली शपथ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्य कांत यांनी भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथग्रहण केले आहे. सोमवारी राष्ट्रपती भवनात त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली आहे. 23 नोव्हेंबरला निवृत्त झालेले माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या स्थानी सरन्यायाधीश सूर्य कांत आता विराजमान होत आहेत. त्यांचा कार्यकाल 24 नोव्हेंबर 2025 ते 9 फेब्रुवारी 2027, असा 14 महिने 17 दिवस असेल, अशी माहिती देण्यात आली.
शपथविधीच्या शानदार समारंभाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा, इतर अनेक केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश आदी मान्यवर उपस्थित होते. त्याव्यतिरिक्त ब्राझील, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंका अशा सात देशांचे सरन्यायाधीश आणि अन्य काही विदेशी न्यायाधीशही त्यांच्या कुटुंबीयांसह उपस्थित राहिल्यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.
हिंदीतून घेतली शपथ
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी हिंदी भाषेतून सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. शपथग्रहण केल्यानंतर त्यांनी आपले ज्येष्ठ बंधू आणि ज्येष्ठ भगिनी यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या कार्यक्रमाला राष्ट्रपती भवनात एकंदर 235 आमंत्रितांची उपस्थिती होती. आमंत्रितांमध्ये त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट, त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील अनेक मित्र, त्यांचे काही शिक्षक आणि प्राध्यापक, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातील अनेक न्यायाधीश, तसेच इतर अनेक महनीय व्यक्तींचा समावेशही केला गेला होता.
सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा अल्पपरिचय
सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 या दिवशी हरियाणा राज्याच्या हिस्सार या जिल्ह्यातील पेटवार या गावात झाला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावीच झाले. 1984 मध्ये त्यांनी कायद्याचे शिक्षण महर्षि दयानंद विद्यापीठातून पूर्ण केले आणि त्याच वर्षी वकिलीला प्रारंभ केला. 1985 मध्ये त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात वकीली करण्यास प्रारंभ केला. घटनात्मक विषय, प्रशासकीय सेवा विषय आणि नागरी प्रकरणे हे त्यांच्या वकीलीचे महत्त्वाचे विषय होते. 7 जुलै 2000 या दिवशी त्यांची हरियाणा राज्याचे मुख्य वकील (अॅडव्होकेट जनरल) म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते हे पद मिळविणारे सर्वात तरुण वकील ठरले. त्याचवर्षी त्यांची ‘ज्येष्ठ वकील’ म्हणूनही नियुक्ती करण्यात आली. 9 जानेवारी 2004 या दिवशी त्यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायाधीशपदावर असताना त्यांनी ‘राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरण मंडळा’चे सदस्य म्हणूनही काम पाहिले. हा कार्यभार त्यांनी 2007 ते 2011 या कालखंडात स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी कायद्यातील पदव्युत्तर शिक्षण प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केले. 5 ऑक्टोबर 2018 या दिवशी त्यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 24 नोव्हेंबर 2029 या दिवशी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्यात आली. निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचीही याच दिवशी योगायोगाने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
अनेक ऐतिहासिक निर्णयांमध्ये सहभाग
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या नात्याने सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी अनेक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय देण्यात सहभाग घेतला आहे. या निर्णयांमध्ये घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ करणे, कथित पेगासिस गुप्तहेरगिरी प्रकरण, निवडणूक रोखे प्रकरण, देशद्रोहासंबंधीचा अनुच्छेद आदींचा समावेश आहे. देशाचे सरन्यायाधीश या नात्याने आपले उत्तरदायित्व, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या 90 हजार प्रकरणांचा भार कमी करून तो हलका करणे ही आपली प्राथमिकता असेल, असे त्यांनी सरन्यायाधीशपदाची धुरा स्वीकारल्यानंतर स्पष्ट केले आहे. देशाचे सरन्यायाधीश या नात्याने आता ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाचे नेतृत्वही करणार आहेत. या न्यायवृंदासमोर सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये महिलांचे प्रमाण वाढविणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्यावर त्यांच्या नेतृत्वात न्यायवृंद कोणती कृती करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
निवृत्त सरन्यायाधीशांनी घालून दिला आदर्श
निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निवृत्त होताना एक महत्त्वाचा आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांनी निवृत्त होताक्षणीच त्यांची सरकारी कारगाडी सोडून ती नूतन सरन्यायाधीश सूर्य कांत यांना उपलब्ध करून दिली आहे. आपल्या सरन्यायाधीशपदाच्या कामकाजाच्या प्रथम दिवसापासून त्यांना ही सरकारी कार उपलब्ध व्हावी, या हेतूने त्यांनी ही कृती केली असून तिची प्रशंसा होत आहे.
ड शपथबद्ध झाल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केली प्राथमिकता
ड सर्वोच्च न्यायालयावरचा 90 हजारहून अधिक प्रकरणांचा भार कमी करणार
ड सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा कार्यकाल जवळजवळ साडेचौदा महिन्यांचा
Comments are closed.