वॉशिंग्टन सुंदरला 8व्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय चुकीचा? गंभीरवर माजी खेळाडूचा रोष, भारत अडचणीत

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया गंभीर संकटात सापडली आहे. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 489 धावा करत मजबूत सुरुवात केली, तर भारताचा डाव केवळ 201 धावांवर गडगडला. त्यामुळे पाहुण्या संघाला 288 धावांची भक्कम आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेनं 26* धावा जोडत एकूण आघाडी 314 धावांपर्यंत नेली आहे.

पहिल्या डावात भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा अपयशी ठरली. यशस्वी जयस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनीच समाधानकारक कामगिरी केली. मार्को जेनसनच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले आणि त्याने 6 गडी बाद करत भारताचा डाव पटकन गुंडाळला. फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजांकडूनही अपेक्षित कामगिरी झाली नाही, ज्यामुळे संघनिवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गौतम गंभीरच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली आहे. कोलकाता कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला फक्त एकच ओव्हर गोलंदाजी मिळाली होती, तरीही त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं, असा उल्लेख शास्त्रींनी केला. चार स्पिनर खेळवूनही सुंदरला गोलंदाजीची संधी न देणं ही मोठी चूक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

रवी शास्त्री यांनी पुढे सांगितलं की, अशा परिस्थितीत अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाच्या जागी अतिरिक्त फलंदाजाला संधी देणे योग्य ठरलं असतं. कोलकाता कसोटीत सुंदरने दोन डाव मिळून सर्वाधिक 60 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवणे योग्या ठरलं असतं, परंतु गुवाहाटीत त्याला पुन्हा आठव्या क्रमांकावर पाठवण्यात आल्याने तो संघात योग्यरीत्या वापरल्या जात नसल्याचे दिसते.

गुवाहाटी कसोटीच्या पहिल्या डावात सुंदरने 48 धावा करत पुन्हा स्वतःची क्षमता दाखवून दिली. तरीही त्याच्या बॅटिंग ऑर्डरबाबतच्या निर्णयांवरून संघ व्यवस्थापनावर शास्त्रींनी उघडपणे प्रश्न उपस्थित केले आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात मालिका गमावल्यानंतर भारताने वेस्ट इंडिजवर 2-0 अशी मात करून पुनरागमन केलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभवाचा धोका निर्माण झाला असून, सामना भारतासाठी अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.

Comments are closed.