धार्मिक ध्वजारोहणासाठी अयोध्या सजली
आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वज फडकवण्याचा कार्यक्रम
वृत्तसंस्था/ अयोध्या (उत्तर प्रदेश)
अयोध्येत रामजन्मभूमी स्थानी साकारलेल्या भव्य राममंदिराच्या शिखरावर आज मंगळवारी धर्मध्वजारोहण करण्यात येणार आहे. हा पवित्र सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी दोन प्रहरी 12 ते 12.30 या ‘अभिजित मुहूर्ता’च्या काळात हे ध्वजारोहण केले जाणार असून या कार्यक्रमाला लक्षावधी भाविक उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. या महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक कार्यक्रमासाठी अयोध्या नगरीची अत्युत्कृष्ट सजावट करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोमवारी या नगरीत वास्तव्यास आले असून ते कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत या नगरीतच राहणार आहेत. त्यांनी त्यांच्या आगमनानंतर संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला असून अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. या कार्यक्रमासाठी संपूर्ण राममंदिर आणि त्याचा परिसर विविध पुष्परचनांनी आणि दीपमाळांनी सजविण्यात आला आहे. अयोध्येतील सर्व मार्ग, सार्वजनिक स्थाने आणि खासगी घरेही सजविण्यात आली असून संपूर्ण नगरी झगमगत आहे, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. हा सोहळा अविस्मरणीय व्हावा, यासाठी सर्व सज्जता केली गेली आहे.
परिसरात आसनांची व्यवस्था
भगवान श्रीरामलल्ला यांच्या मंदिराच्या परिसरात आमंत्रितांना आणि उपस्थितांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांची मांडामांड रविवारीच पूर्ण करण्यात आली आहे. आठ हजार आसनांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक आमंत्रिताने आणि उपस्थिताने कोणत्या आसनावर बसावे, हे सुद्धा निर्धारित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. एकंदर, 19 विभागांमध्ये या आसनांची व्यवस्था करण्यात आली असून आमंत्रितांच्या श्रेणींप्रमाणे बसण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक उपस्थिताला हा रोमांचक सोहळा विनासायास पाहता यावा, अशी योजना करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र महासचिव चंपत राय यांनी दिली आहे.
हेलिकॉप्टरने आगमन होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत मंगळवारी सकाळी येणार आहेत. येथील साकेत महाविद्यालयापर्यंत ते हेलिकॉफ्टरने येतील. ते ‘शंकराचार्य प्रवेशद्वारा’तून (प्रवेशद्वार क्रमांक 11) श्रीराममंदिर परिसरात प्रवेश करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असलेल्या सर्व मार्गांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
मंडपापेक्षा रंगात हातपाय
श्रीराममंदिर परिसरात भिन्न भिन्न आकर्षक रंगांचे अनेक मंडप उभे करण्यात आले आहेत. त्यांचे रंग पारंपरिक जनपद संस्कृतींची वैशिष्ट्यो लक्षात घेऊन निर्धारित करण्यात आले आहेत. सर्व विभागांमध्ये अतिथींच्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळी कार्यकर्ता पथके स्थापन करण्यात आली आहेत. साकेत महाविद्यालय ते रामपथ ते मंदिर परिसर या सर्व मार्गांवर सुरक्षेचा अतिदक्ष व्यवस्था करण्यात आली आहे.
पाच दिवसांच्या अनुष्ठानाची सांगता
धर्मध्वज आरोहणाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ विविध धार्मिक अनुष्ठानांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. शुक्रवारपासून मंगळवारी सकाळपर्यंत पाच दिवस ही अनुष्ठाने केली जात असून आज दोन प्रहरी त्यांची सांगता होणार आहे. त्यानंतर धर्मध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होत आहे. या भव्य धर्मध्वजाचे अनावरण शनिवारी करण्यात आले. त्याची लांबी 22 फूट तर रुंदी 11 फूट आहे. तो प्रात:कालीन सूर्याच्या रक्तीम-भगव्या रंगाचा असून त्याच्या मध्यभागी ॐ हे प्रवित्र हिंदूधर्मचिन्ह चितारलेले आहे. कोणत्याही वातावरणात, वादळात किंवा अननुकूल परिस्थितीतही तो अक्षत राहील अशी त्याची रचना केली गेली आहे.
धर्मध्वजारोहणाची सर्व सज्जता पूर्ण
ड आज दोन प्रहरी ‘अभिजित मुहूर्ता’वर धर्मध्वजाचे आरोहण केले जाणार
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार धर्मध्वजारोहणाचा हा कार्यक्रम
ड अयोध्येत सर्वत्र कडेकोट सुरक्षा, अर्धसैनिक दले, अन्य व्यवस्था परिपूर्ण
Comments are closed.