डहाणूच्या मेंढवण खिंडीतील जंगलात सापडला माजी फुटबॉलपटूचा मृतदेह, आत्महत्या की हत्या? कासा पोलिसांचा तपास सुरू

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या डहाणूच्या मेंढवण खिंडीतील जंगलात माजी फुटबॉलपटूचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अंडर19 फुटबॉलपटू सागर सोरटी (35) याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सागरने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा पोलीस तपास करत आहेत.

15 नोव्हेंबर रोजी पुणे येथे फुटबॉल खेळण्यास जात असल्याचे सांगून सागर सोरटी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर सागर आणि त्याचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला होता. दरम्यान, थेट 17 नोव्हेंबरच्या संध्याकाळी मेंढवण खिंडीतील जंगलात त्याचा मृतदेह आढळल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. एकेकाळी क्रीडा क्षेत्रात चमक दाखवणाऱ्या या प्रतिभावान फुटबॉल पटूच्या निधनाने क्रीडा वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भावाच्या लगीनघाईत सागर तणावाखाली

सागर गेल्या दोन वर्षांपासून मानसिक तणावाखाली होता. धाकट्या भावाचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते. यावेळी सागर तणावाखाली असून लग्नासाठी नवे कपडे शिवण्यास त्याने नकारही दिला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट

सागरचा मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि पुढील कारवाई करता येईल, अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी दिली.

Comments are closed.