जेम्स वेब टेलिस्कोपचे मोठे यश; विश्वातील सर्वात जुने तारे सापडल्याची शक्यता, अनेक रहस्य उलगडणार

नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने विश्वातील सर्वात जुना तारे शोधल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिग बँगनंतर थोड्याच काळात तयार झालेले हे तारे ‘पॉप्युलेशन थ्री’ किंवा POP III म्हणून ओळखले जातात. हे तारे LAP1-B नावाच्या आकाशगंगेत आढळले असून ती पृथ्वीपासून तब्बल 13 अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे. गेल्या महिन्यात अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये या संदर्भातील संशोधन प्रकाशित झाले.
खगोलशास्त्रज्ञ एली विस्बल यांच्या नेतृत्वाखालील टीमने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने इन्फ्रारेड स्पेक्ट्रममधून POP III तार्यांचे संकेत मिळाल्याचे नमूद केले. या तार्यांनी अतिशय प्रखर अल्ट्राव्हायोलेट किरणे उत्सर्जित केली असून त्यांचे वजन सूर्याच्या वजनापेक्षा जवळपास 100 पटीने जास्त असल्याची माहिती अभ्यासात दिली आहे. तसेच LAP1-B या आकाशगंगेत POP III तारे तयार होण्यासाठी आवश्यक असलेली तीन सैद्धांतिक अटीही पूर्ण झाल्या आहेत. हायड्रोजन आणि हीलियम, अत्यल्प तारकसमूह आणि योग्य प्रारंभिक द्रव्यमान संरचना यावर ते आधारित आहे.
विस्बल यांनी सांगितले की, जर हे तारे खरोखरच Pop III असतील, तर विश्वातील आदिम तार्यांचा हा पहिला शोध आहे. यांना शोधण्यासाठी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपची संवेदनशीलता आणि आकाशगंगा समूहाद्वारे मिळालेली गुरुत्वीय लेन्सिंगमुळे 100 पट वाढलेली प्रतिमा यांचे मोठे योगदान आहे.
या तार्यांमुळे विश्वात पहिल्या आकाशगंगा आणि प्रचंड तारे कसे तयार झाले, याबाबत नवी माहिती मिळू शकते. प्रचलित सिद्धांतानुसार, हायड्रोजन, हीलियम आणि डार्क मॅटर यांच्या संयोगातून सूर्यापेक्षा दशलक्षपट मोठे आणि अब्जपट अधिक तेजस्वी तारे तयार झाले होते.
विस्बल यांनी पुढे सांगितले की, “आता आम्ही Pop III ते Pop II तार्यांच्या संक्रमणाचा अभ्यास करणाऱ्या अधिक सविस्तर सिम्युलेशनवर काम करू, जे LAP1-B च्या स्पेक्ट्रमशी जुळते का हे पाहणार आहोत.” संशोधकांच्या मते, LAP1-B ही फक्त सुरुवात असून अशा अनेक वस्तूंचा अभ्यास गुरुत्वीय लेन्सिंगच्या मदतीने पुढे होऊ शकतो.

Comments are closed.