फेस ब्युटीच्या नादात महिलांचा अजब प्रयोग,पीरियड ब्लड फेस मास्क ट्रेंडने उडवली खळबळ
सध्या सोशल मीडियावर सौंदर्याशी संबंधित अनेक ट्रेंड व्हायरल होत आहेत. चमकदार त्वचा मिळवण्यासाठी लोक वेगवेगळे घरगुती उपाय करताना दिसतात. मात्र अलीकडे एक अतिशय विचित्र आणि धोकादायक ट्रेंड चर्चेत आला आहे, तो म्हणजे मासिक पाळीचे रक्त चेहऱ्यावर लावण्याचा प्रकार. या ट्रेंडला “मून मास्किंग” असे नाव देण्यात आले आहे. (menstrual blood face mask trend)
हा ट्रेंड काही सोशल मीडिया व्हिडिओमधून लोकांपर्यंत पोहोचला. काही महिलांनी पीरियडचे रक्त चेहऱ्यावर लावल्याचे व्हिडिओ पोस्ट केले आणि दावा केला की यामुळे त्वचा मऊ होते, ग्लो येतो आणि मुरुम कमी होतात. पाहता पाहता हा प्रकार अनेकांनी फॉलो करायला सुरुवात केली आणि या गोष्टीबद्दल उत्सुकता वाढली.
मून मास्किंग म्हणजे काय?
मासिक पाळीच्या वेळी मेन्स्ट्रुअल कपमध्ये जमा झालेले रक्त थेट चेहऱ्यावर फेस पॅकसारखे लावणे, यालाच मून मास्किंग म्हटले जाते. काही वेळ ते त्वचेवर ठेवून नंतर चेहरा धुतला जातो. सोशल मीडियावर याला नैसर्गिक ब्युटी मास्क असेही सांगितले जात आहे.
पण हे खरंच सुरक्षित आहे का?
खरं पाहता या पद्धतीचे फायदे सिद्ध झालेले नाहीत, मात्र त्याचे धोके नक्कीच गंभीर आहेत. पीरियड ब्लड हे फक्त रक्त नसते. त्यामध्ये वजायनामधील बॅक्टेरिया, मृत पेशी आणि सूक्ष्मजंतू असतात. हे घटक चेहऱ्यासारख्या संवेदनशील त्वचेवर गेल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो.अनेकवेळा यामुळे त्वचेला खाज, जळजळ, लालसरपणा, रॅशेस आणि पिंपल्स वाढू शकतात. ज्यांना आधीच मुरुमांची समस्या आहे, त्यांच्यासाठी हा प्रकार अधिक धोकादायक ठरू शकतो. एकदा त्वचेला इन्फेक्शन झाल्यास ते बरे होण्यासाठी वेळ आणि उपचार लागतात.
सोशल मीडियामुळे वाढलेले गैरसमज
या ट्रेंडला काही लोक महागड्या स्किन ट्रीटमेंटचा घरगुती पर्याय म्हणूनही दाखवत आहेत. मात्र हे दावे पूर्णपणे चुकीचे आहेत. पीरियड ब्लड आणि त्वचेसाठी वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय प्रक्रियांमध्ये मोठा फरक आहे. याबाबत कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
म्हणूनच, फक्त व्हायरल झाला म्हणून प्रत्येक ट्रेंड सुरक्षित असेलच असे नाही. त्वचा हा शरीराचा अतिशय नाजूक भाग आहे. त्यावर कोणतीही अस्वच्छ किंवा धोकादायक गोष्ट लावणे टाळले पाहिजे. त्वचा सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छता, योग्य आहार, पाणी पिणे आणि सुरक्षित स्किन केअर उत्पादने वापरणे हेच योग्य मार्ग आहे कारण सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते.
Comments are closed.