पंडित-क्षीरसागरांत वादाची ठिणगी, पवारांच्या भेटीने घड्याची टिकटिक मंदावली

बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये क्षीरसागर घराणे आणि पंडित घराण्याचा राजकीय वाद सर्वश्रूत आहे. त्यातच पंडितांनी बीडच्या राजकारणामध्ये लक्ष घालायला सुरूवात केल्याने राजकीय समिकरणे बदलली. आणि त्याचा वचपा काढण्यासाठी जयदत्त क्षीरसागरांनी गेवराईत पंडितांच्या विरोधात आपले फासे फेकायचे सुरूवात केली. कालच त्यांनी भाजपाच्या बाळराजे पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या नव्या राजकीय समिकरणामुळे गेवराईत अजित पवार गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बीडच्या राजकारणामध्ये माजी खासदार स्व.केशरबाई क्षीरसागर यांचे नाव जसे आदराने घेतले जाते. तसेच माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचेही नाव आदराने घेतले जाते. हे दोन्ही नेते कित्येक दशक शरद पवारांकडे होते. मात्र यांच्यात नेहमीच राजकीय मतभेद कायम राहिले. केशरबाई क्षीरसागर लोकसभा निवडणूक लढवत असताना जोपर्यंत त्यांचा पराभव होत नाही, तोपर्यंत आपण डोक्यावर टोपी घालणार नाहीत, अशी प्रतिज्ञा शिवाजीराव पंडित यांनी घेतली होती. या राजकीय वादातून दोन्ही घराण्यांनी नेहमीच वचपा काढण्याचे काम केले आहे. पुढच्या पिढीत म्हणजेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि माजी मंत्री अमरसिंह पंडित यांच्यातीलही वाद कायम राहिला. अमरसिंह पंडितांसोबतच्या मतभेदामुळेच जयदत्त क्षीरसागरांनी बदामराव पंडितांना जवळ केले होते. त्यातूनच अमरसिंह पंडितांना विधानसभेत पराभव पत्कारावा लागला होता.
अलिकडच्या काळात पुन्हा पंडित-क्षीरसागरांच्या वादाला तोंड फुटले आहे. होवू घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत गेवराईत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व अमरसिंह पंडित आणि त्यांचे बंधू विजयराजे पंडित करत आहेत. तर विरोधात उभा असलेल्या भाजपाच्या गटाचे नेतृत्व बाळराजे पवार करत आहेत. पंडितांनी गेवराईच्या राजकारणासोबतच बीड शहराच्या राजकारणामध्ये लक्ष घालायला सुरूवात केली. नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी ठरवण्याचे कामही पंडितांनी केले. त्या मतभेदातूनच योगेश क्षीरसागर यांनी तडकाफडकी अजित पवारांचा गट सोडून भाजपात प्रवेश केला. बीडच्या राजकारणामध्ये पंडित ढवळाढवळ करत असल्याने शांत बसलेल्या जयदत्त क्षीरसागरांनी निवडणुकीच्या तोंडावर गेवराई मतदारसंघामध्ये लक्ष घालायला सुरूवात केली आहे. विरोधकांचा विरोधक आपला मित्र या सुत्रातूनच जयदत्त क्षीरसागरांनी कालच भाजपाच्या बाळराजे पवारांची भेट घेवून नगरपालिका निवडणुकीमध्ये पंडितांच्या पराभवासाठी डावपेच आखायला सुरूवात केली. या राजकीय घडामोडींने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा पंडित-क्षीरसागरांचा वाद पेटतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Comments are closed.