मुंबईच्या यादीत एकाच मतदाराचे 103 वेळा नाव, 4 लाख 33 हजार मतदारांची नावे एकापेक्षा जास्त वेळा

मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत एकाच व्यक्तीचे तब्बल 103 वेळा नाव आढळले आहे. तर 4 लाख 33 हजार मतदारांची नावे एकापेक्षा जास्त वेळा असल्याचेही समोर आल्याने मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईत एकूण एक कोटी तीन लाख मतदार आहेत.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आल्याने निवडणूक मतदान प्रक्रियेसंदर्भात काम सुरू केले आहे. यामध्ये 20 नोव्हेंबरला मतदारांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीवर हरकती-सूचना नोंदवण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र याद्यांमध्ये असलेल्या गोंधळामुळे हरकती-सूचना नोंदवण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांकडून केली जात आहे. यातच आता प्रारूप मतदार यादीमधील अनेक घोळ समोर आल्यामुळे पालिका काय निर्णय घेते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- सर्वाधिक दुबार मतदार प्रभाग क्रमांक 199 मध्ये असून येथील त्यांची संख्या 8 हजार 207 आहेत, तर सर्वात कमी प्रभाग क्रमांक 227 मध्ये असून येथील संख्या 2 हजार 98 एवढी आहे.
5 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम
दुबार किंवा जास्त वेळा नाव असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता यावे यासाठी आयोगाकडून 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत घरोघरी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यावेळी दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करावे त्यासाठी माहिती दिली जाणार आहे. मात्र दुबार मतदार हटवण्यासाठी निवडणूक आयोगासमोर आव्हान असणार आहे.
धारावीत 70 हजार मतदारांची हेराफेरी, प्रत्येक वॉर्डातून 10 हजार मतदारांना दुसऱ्याच वॉर्डात हलवले
धारावीच्या मतदार यादीत जवळपास 70 हजार मतदारांची हेराफेरी झाली आहे. प्रत्येक वॉर्डातून सुमारे 8 ते 10 हजार मतदारांना दुसऱयाच वॉर्डात हलवले गेले आहे. धारावीकरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा डाव असल्याचा आरोप धारावीच्या काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी केला. धारावीत एक-दोन वॉर्डात नव्हे तर संपूर्ण धारावीमध्ये प्रत्येक वॉर्डातील हजारो मतदारांची नावे यादीत त्यांच्या मूळ वॉर्डात दिसतच नाहीत. त्यांना दुसऱ्याच वॉर्डात दाखवण्यात आले आहे, असा दावा आमदार गायकवाड यांनी उदाहरणासह केला.

Comments are closed.