अयोध्येत राणीच्या हस्ते धार्मिक ध्वजारोहण करण्यात आले.
राम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामध्वजारोहण : सरसंघचालकांचीही मुख्य उपस्थिती
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येतील जगप्रसिद्ध राम मंदिराच्या प्रांगणात मंगळवारचा दिवस इतिहासात कोरला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत राम मंदिराच्या शिखरावर भगवा धर्मध्वज फडकविण्यात आला. हा धर्मध्वज मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रतीक मानले जात आहे. या माध्यमातून अयोध्येत राम मंदिर व्हावे हे 500 वर्षांपासूनचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी रामलल्लाचे दर्शन घेत राम दरबारात विधीवत पूजा केली.
उत्तरप्रदेशमधील अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर मंगळवार दि. 25 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक सोहळा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या शुभ पंचमीला, श्रीराम आणि माता सीतेच्या विवाह पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत यांनी पवित्र श्री रामजन्मभूमी मंदिराच्या शिखरावर औपचारिकरित्या भगवा ध्वज फडकाविला. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि त्यावर आज धर्मध्वजारोहणही करण्यात आले. या ध्वजारोहण सोहळ्dयादरम्यान मोदी यांनी ध्वजाला वंदन केले. तसेच या पवित्र क्षणी हात जोडून भगवान श्रीरामालाही नमस्कार केला.
'जय श्री राम'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा ध्वज फडकविण्यात आला. अभिजीत मुहूर्तावर दुपारी ठीक 11:45 वाजता मोदींनी रिमोटचे बटण दाबल्यानंतर अवघ्या 4 मिनिटांत हा ध्वज मंदिराच्या शिखरावर पोहोचला. जसा ध्वज शिखरावर पोहोचला, तसा संपूर्ण परिसर ‘जय श्री राम’च्या जयघोषाने दुमदुमला. अत्यंत भक्तीमय वातावरणात हा ध्वजारोहण सोहळा पार पडला.
या ऐतिहासिक सोहळ्यामुळे मंगळवारचा दिवस सुवर्ण इतिहासात नोंदवला गेला आहे.अभिजित मुहूर्ताच्या वेळी वैदिक जप दरम्यान ध्वजारोहण झाल्यामुळे अयोध्यानगरी उत्साही वातावरणात बुडाली होती. अयोध्येच्या रस्त्यांवर धार्मिक घोषणांचे आवाज गुंजत राहिले. याप्रसंगी सात सांस्कृतिक व्यासपीठांवर लोक कलाकारांनी नृत्य आणि गाण्याने वातावरण धार्मिक बनवले. हजारो भाविक आणि संतांनी हा क्षण पाहिला. अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत हा कार्यक्रम शांततेत आणि भव्यपणे पार पडला.
मंदिराला आकर्षक फुलांची आरास
या सोहळ्यानिमित्त नगर निगमने 500 क्विंटलहून अधिक फुलांचा वापर करून रामपथ सजवला होता. मुख्य मंदिरासोबतच आजुबाजुच्या परिसरातही सुंदर सजावट करण्यात आली होती. या सजावटीतून रामराज्याच्या स्थापनेचा उत्सव साजरा होत असल्याचे दिसून येत होते. धर्मध्वजारोहणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो करत राम जन्मभूमी परिसरातील मंदिरात पोहोचले. सर्वप्रथम सप्त ऋषी मंदिरात जाऊन महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहिल्या आणि माता शबरी यांचे दर्शन घेतले. राम दरबारच्या गर्भगृहात पोहोचून रामलल्लांचे विधिवत दर्शन-पूजन करत आरतीही केली.
…असा आहे भगवा धर्मध्वज!
राम मंदिराच्या शिखरावर फडकवण्यात आलेल्या विशेष भगव्या ध्वजावर सूर्यवंशाची प्रतीक चिन्हे आहेत. प्रभू श्रीराम यांची प्रतिमा आणि वीरतेचे प्रतीक असलेले तेजस्वी सूर्य यांचे चित्र आहे. यासोबतच त्यावर कोविदार वृक्षाचे चित्र आणि ‘ॐ’ हे चिन्हही आहे. पुराणांनुसार, कोविदार वृक्ष हे रामराज्याच्या ध्वजात अंकित असलेले राजचिन्ह मानले जाते. श्रीराम मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फूटाचा स्तंभ बसवण्यात आला आहे. या स्तंभावर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असा हा भगवा-केशरी ध्वज फडकविण्यात आला आहे. हा ध्वज सुमारे 4 किलोमीटर दूरूनही दिसणार आहे. मंदिर परिसरात जोरदार वारे वाहत असल्यास ध्वज 360 अंशात फिरू शकतो अशी व्यवस्था आहे. या धर्मध्वजाच्या रोहणासाठी राम मंदिरात ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. भविष्यात ध्वज बदलण्यासाठीही हीच पद्धत वापरली जाईल. 
…हा रामराज्याचा ध्वज : सरसंघचालक मोहन भागवत
सरसंघचालक मोहन भागवत यांनीही या क्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. राम मंदिरासाठी 500 वर्षे संघर्ष झाला आणि आज त्या संघर्षाचा शेवट पूर्णत्वाने झाला आहे. हा दिवस अत्यंत पवित्र आहे. असंख्य लोकांनी राम मंदिराचे स्वप्न पाहिले. त्यासाठी संघर्ष केला, बलिदान दिले. आज त्यांचा आत्मा शांत झाला असेल. हा रामराज्याचा ध्वज आहे. एकेकाळी अयोध्येत ज्याचे अस्तित्व होते, तो ध्वज आज पुन्हा मंदिराच्या शिखरावर फडकताना पाहणे हे अपार आनंदाचे क्षण आहेत. भगवा रंग हा धर्म, धैर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे. अयोध्येतील या दिव्य सोहळ्याने देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भगवान रामाच्या नगरीत नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
राम भेदांशी नाही तर भावनांशी जोडतो : पंतप्रधान
अयोध्येत धर्मध्वज फडकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ध्वजाची महती अधोरेखित केली. आपला राम भेदांशी नाही तर भावनांशी जोडतो. त्यांच्यासाठी व्यक्तीचा वंश महत्त्वाचा नाही तर त्यांची भक्ती महत्त्वाची आहे. तो मूल्यांना महत्त्व देतो, वंशाला नाही. तो सहकार्याला महत्त्व देतो, सत्तेला नाही. आज आपणही त्याच भावनेने पुढे जात आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. आपण भगवान रामांकडून काहीतरी शिकले पाहिजे. आपण त्यांच्या चारित्र्याची खोली समजून घेतली पाहिजे. राम म्हणजे प्रतिष्ठा, राम म्हणजे जीवन आणि आचरणाचा सर्वोच्च आदर्श. राम सर्वोच्च सद्गुणांचे जीवन दर्शवितो. राम नीतिमत्तेच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतो, असेही त्यांनी पुढे सांगितले.
गेल्या 11 वर्षांत महिला, दलित, मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्गीय, आदिवासी, वंचित, शेतकरी, कामगार आणि तरुणांसह समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. जेव्हा देशातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वर्ग, प्रत्येक प्रदेश सक्षम होईल, तेव्हा प्रत्येकाचे प्रयत्न त्यांच्या संकल्प पूर्ण करण्यासाठी वापरले जातील आणि प्रत्येकाच्या प्रयत्नांद्वारेच आपण 2047 पर्यंत, जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा विकसित भारत निर्माण करू शकू, असेही पंतप्रधान म्हणाले.
हा भगवा ध्वज धर्माचे प्रतीक : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
हे भव्य मंदिर 140 कोटी भारतीयांच्या श्रद्धेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व कर्मयोगींचे मी अभिनंदन करतो. हा ध्वज धर्माचा प्रकाश शाश्वत आहे आणि रामराज्याची तत्वे कालातीत आहेत याचा पुरावा आहे. 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले तेव्हा लाखो भारतीयांच्या हृदयात जागृत झालेली श्रद्धा आता या भव्य राम मंदिराच्या रूपात प्रकट होत आहे. हा भगवा ध्वज धर्म, निष्ठा, सत्य, न्याय आणि राष्ट्रीय कर्तव्याचे प्रतीक आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
Comments are closed.