बद्रीनाथ धामचे दरवाजे थंडीमुळे बंद आहेत.
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडच्या चमोली येथे अप्पर गढवाल भागात असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे मंगळवारी दुपारी 2:56 वाजता हिवाळी ऋतूमुळे बंद करण्यात आले. या प्रक्रियेमुळे यावर्षीच्या चारधाम यात्रेचा औपचारिक समारोप झाला. यापूर्वी 22 ऑक्टोबर रोजी अन्नकुटाच्या उत्सवादरम्यान गंगोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केदारनाथ आणि यमुनोत्रीचे दरवाजे बंद करण्यात आले होते. यावर्षी भारत आणि परदेशातून सुमारे 51 लाख भाविक चारधाम यात्रेत सहभागी झाले होते. आता पुढील वर्षी एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला चारधाम यात्रा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
उत्तराखंडमधील असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होणार असल्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच हजारो भाविकांनी अंतिम दर्शन घेण्यासाठी धाममध्ये गर्दी केली होती. दरवाजे बंद करण्यापूर्वी शनिवारपासूनच विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला होता. यादरम्यान पंच पूजांची मालिका सुरू होती. गणेश मंदिर, आदि केदारेश्वर आणि आदि गुरु शंकराचार्य गद्दी स्थळ यांचे दरवाजे योग्य विधींनी बंद करण्यात आले. ही स्थळे बंद होताच मंदिरात वैदिक स्तोत्रांचे पठण देखील बंद करण्यात आले. आता पुढील हंगामात दरवाजे उघडल्यानंतर पुन्हा सर्व विधी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
Comments are closed.