नगरविकास विभागातील ‘माल’ वापरून नगरपरिषदेची सत्ताही खिशात घालावी; रोहित पवार यांचा निशाणा

राज्यासह देशभरात सध्या वोटचोरीचा मुद्दा गाडत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजप, मिंधे आणि अजित पवार गटाकडून पैशांचा गैरवापर होत आहे. तसेच नगरविकास खाते आणि त्यातून मिळणार माल, याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
नगरविकास विभाग एवढा सक्षम असतानाही राज्यातील शहरं का भकास होतात आणि मग नेमका विकास कुणाचा होतो? या प्रश्नाचं उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं. ‘‘आपल्याकडं नगरविकास खातं आहे, त्यात माल आहे आणि १ तारखेला लक्ष्मी येणार,’’ या त्यांच्या विधानाचा अर्थ निवडणूक आयोगाला खरंच कळत…
– रोहित पवार (@RRPSpeaks) २६ नोव्हेंबर २०२५
याबाबत एक्सवर रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नगरविकास विभाग एवढा सक्षम असतानाही राज्यातील शहरं का भकास होतात आणि मग नेमका विकास कुणाचा होतो? या प्रश्नाचं उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं. आपल्याकडं नगरविकास खातं आहे, त्यात माल आहे आणि १ तारखेला लक्ष्मी येणार, या त्यांच्या विधानाचा अर्थ निवडणूक आयोगाला खरंच कळत नाही का? आता ‘माल’ही यांचा आणि निवडणूक आयोगाचे ‘मालक’ही हेच, मग निवडणुकीचं नाटक करून जनतेला वेड्यात काढण्यापेक्षा ज्याप्रमाणे सूरत-गुवाहाटी मार्गे खोक्याच्या माध्यमातून राज्याची सत्ता हिसकावली तसं आता नगरविकास विभागातील ‘माल’ वापरून नगरपरिषदेची सत्ताही खिशात घालावी, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Comments are closed.