विद्यार्थी – विद्यार्थिनींनी केलं ST रोको आंदोलन, नेमकं काय आहे कारण? वाचा सविस्तर

राजापूरमध्ये विद्यार्थ्यांनी एसटी रोको आंदोलन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,राजापूरहून सकाळी ६ वाजता सुटणारी राजापूर-ओझर गाडी ही ७:३० च्या कॉलेजला जाणाऱ्या ओझर व ओणी येथील विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचवत होती. गेले अनेक वर्षे चालू असणारी ही गाडी अचानक बंद करून येरडव-राजापूर (व्हाया ओझर) अशी फेरी सुरू केली. ही गाडी आता ओझरला ८:१० ला येते. त्यामुळे मुलांना ७:३० च्या कॉलेजला उशीर होतो.
सुमारे २५ विद्यार्थी पासधारक आहेत. त्यामुळे दोन-तीन तास वाया जाऊन शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत ओझर ग्रामपंचायतीने तसेच नूतन विद्यामंदिर ओणीने वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव पासधारक विद्यार्थ्यांनी आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी ओझर येथे एसटी रोको आंदोलन केले. परंतु निष्काळजी डेपो व्यवस्थापकाने कोणतीही लेखी सुधारणा देण्याचे पत्र न देता फक्त “कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील” अशा आशयाचे पत्र दिले आहे. मात्र विद्यार्थी व पालकांची मागणी आहे की, पूर्वीप्रमाणे राजापूरहून सकाळी ६ वाजता सुटणारी राजापूर-ओझर अशी फेरी पुन्हा सुरू करण्यात यावी जेणेकरून गाडी सकाळी ६:४५ ला ओझरला पोहोचेल आणि विद्यार्थ्यांना ७:३० च्या कॉलेजला वेळेत जाता येईल. सदर गाडी पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी ओझर पंचक्रोशीतून होत आहे.

Comments are closed.