Modern Parenting Trends: डायपर बदलतानाही बाळाचं मत महत्त्वाचं? नव्या पॅरेंटिंग ट्रेंडची जोरदार चर्चा
बाळ जन्माला आल्यानंतर डायपर हा प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनतो. बाळाला डायपर घालणे आणि वेळोवेळी बदलणे हे पालकांच्या रोजच्या आयुष्याचा मोठा भाग असतो. सोयीसाठी, स्वच्छतेसाठी आणि बाळाच्या आरामासाठी डायपर वापरणे गरजेचे मानले जाते. मात्र आता पालकत्वाबाबत एक नवा विचार पुढे येत असून, त्याची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. (ask consent before diaper change)
आजकाल ‘मॉडर्न पॅरेंटिंग’मध्ये असा दावा केला जातो आहे की, बाळाचे डायपर बदलण्यापूर्वी त्यांची परवानगी घेणे महत्त्वाचे आहे. जरी बाळ बोलू शकत नसले, तरी त्यांच्याशी बोलणे, त्यांना आधी कल्पना देणे आणि त्यांच्या प्रतिक्रियेला महत्त्व देणे, ही या नव्या संकल्पनेची मुख्य कल्पना आहे.
या पद्धतीमागचा साधा विचार असा आहे की, बाळाला लहान वयातच त्यांच्या शरीराबाबतची जाणीव व्हावी. त्यांचे शरीर हे त्यांचं आहे आणि त्यांच्या शरीराशी संबंधित कोणतीही कृती करताना त्यांचं मत महत्त्वाचं आहे, ही भावना त्यांच्या मनात लहानपणापासून रुजवण्याचा हा प्रयत्न आहे.
जेव्हा पालक डायपर बदलण्याआधी बाळाशी संवाद साधतात, तेव्हा बाळ आणि पालक यांच्यातील नात्यात विश्वास निर्माण होतो. अचानक काही घडत नाही, आपल्याला आधी सांगितले जाते, ही भावना बाळाला सुरक्षित वाटायला मदत करते. भविष्यात मुलांना स्वतःबद्दल बोलण्याचं, ‘नाही’ म्हणण्याचं धाडस देण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते, असं मानलं जात आहे.
दिसायला छोटी वाटणारी ही कृती प्रत्यक्षात खूप महत्त्वाची असू शकते. डायपर बदलणे ही एक खाजगी आणि वैयक्तिक बाब आहे. त्या वेळी बाळाशी शांतपणे बोलणे, हसत खेळत संवाद ठेवणे आणि बाळाच्या हालचाली लक्षात घेणे, यातून त्यांना आदराची शिकवण मिळते.
पालकांनी हे कसं करावं? खूप सोप्या पद्धतीने हे दैनंदिन आयुष्यात आणता येऊ शकतं. डायपर बदलण्याआधी बाळाला सांगावं की “आता आपण डायपर बदलूया, ठीक आहे ना?” किंवा “मी तुला साफ करणार आहे” अशा शब्दांत संवाद साधावा. क्षणभर थांबून बाळाच्या डोळ्यातील भाव, हातापायांची हालचाल किंवा अस्वस्थता लक्षात घ्यावी.
डायपर बदलताना बाळाला घाबरवणे किंवा त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याऐवजी, त्या प्रक्रियेत त्यांना सामील करून घ्यावं. “तू पाय वर करशील का?” अशा साध्या विनंतीमुळेही बाळाला आपलं अस्तित्व महत्त्वाचं आहे, असं वाटायला लागतं.
या पद्धतीचे काही फायदे दिसून येतात. मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना तयार होते. आपण महत्त्वाचे आहोत, आपल्या भावना महत्त्वाच्या आहेत, असा विश्वास तयार होतो. मोठं झाल्यावर स्वतःच्या शरीराबाबत बोलण्याचं धाडस येऊ शकतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पालक आणि बाळ यांच्यातील भावनिक नातं अधिक घट्ट होतं.
म्हणूनच, डायपर बदलणे ही केवळ एक रोजची सवय नसून, ती बाळाच्या मानसिक आणि भावनिक विकासाशी देखील जोडलेली असू शकते, असा विचार आता पुढे येत आहे.
Comments are closed.