हिंदुस्थानला २० वर्षांनंतर मिळालं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद, २०३० मध्ये अहमदाबाद येथे होणार आयोजन

हिंदुस्थानला २० वर्षांनंतर पुन्हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2030) आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जनरल असेम्बलीच्या बैठकीत हिंदुस्थानला २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद जाहीर करण्यात आलं.
हिंदुस्थानने शेवटची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१० मध्ये दिल्ली येथे आयोजित केली होती. यावेळी ही स्पर्धा अहमदाबादमध्ये आयोजित केली जाणार आहे. २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बोलीमध्ये हिंदुस्थानने नायजेरियातील अबुजा या देशाशी स्पर्धा केली होती.
आयोजनासाठी मुख्य ठिकाण म्हणून सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव निवडण्यात आलं आहे. या परिसरात नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, एक्वाटिक्स सेंटर, फुटबॉल स्टेडियम, इनडोअर अॅरिना आणि ३,००० खेळाडूंसाठी एथलीट व्हिलेज यांचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन हे कोणत्याही देशासाठी केवळ एक क्रीडा स्पर्धा नाही तर, ती त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा, विकास क्षमता, पायाभूत सुविधा आणि दृष्टीकोन यांचे प्रतीक आहे. आतापर्यंत नऊ देशांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, हिंदुस्थान, कॅनडा आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. हिंदुस्थानला दुसऱ्यांदा यजमानपद मिळालं आहे.

Comments are closed.