सरकारच्या तिजोरीतले पैसे कुणाच्या वडिलोपार्जित इस्टेटीतले नाही, ओमराजेंनी अजित पवारांना सुनावले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी एका प्रचारसभेत बोलताना थेट ‘तुमच्या हातात मत आहे तर माझ्या हातात निधी आहे’, असे मतदारांना सुनावले होते. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी देखील यावरून अजित पवारांना चांगलेच सुनावले.

”या पद्धतीची वक्तव्य महाराष्ट्राच्या प्रमुख पदाच्या व्यक्तीने करणं शोभत नाही. आपण फक्त विश्वस्त आहोत तिजोरीतला पैसा हा सर्वसामान्यांचा आहे. सर्वसामान्यांच्या खिशातून कराच्या माध्यमातून जमा झालेला आहे. त्या पैशाचा लोकांच्या कामासाठी, समाजोपयोगी कामासाठी आपण वापर करत असतो. ते पैसे आपल्या वडिलोपार्जित, बापजाद्यांच्या इस्टेटीतले नाही. हा लोकांचा पैसा आहे. आपण विश्वस्त म्हणून बसलो आहोत. आपण सगळ्यांशी समान वागणूक ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे”, असे ओमराजे यांनी सुनावले.

”मी जेव्हा जिंकलो तेव्हा असं सांगितलं होतं की ज्याने मला मत दिलं त्याचाही मी खासदार आहे आणि नाही दिलं त्याचाही मी खासदार आहे. एकदा आपण पदावर बसलो की आपण कुणाशीही ममत्व व आकस भाव न ठेवण्याची शपथ घेत असतो. त्या शपथेचा विसर कुठल्याही प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीला पडू देऊ नये”, असेही ओमराजे म्हणाले.

Comments are closed.