संविधान बदलण्याचे कोणाचेही मनसुबे कधीही साकार होणार नाहीत – प्रा. मिथून येलवे

पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका या हिंदुस्थानच्या शेजारी राष्ट्रांच्या राज्यघटना एकामागून एक कोसळत असताना हिंदुस्थानात आजही लोकशाही ठाम, कायम आणि परिणामकारक ठरलीय. याचे संपूर्ण श्रेय हे संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते. आज पडद्यामागून संविधान बदलण्याचे कारस्थान कोणीही करत असले तरी, ते अशक्य ठरतील कारण संविधानाच्या शिल्पकारांनी हे सगळे धोके आपल्या दूरदृष्टीने आधीच ओळखून तशा ठाम तरतुदी त्यांनी केल्या आहेत, असे प्रतिपादन संविधानाचे अभ्यासक प्रा.मिथून येलवे यांनी आज दापोलीत केले. दापोली शहरातील पेन्शनर्स असोसिएशनच्या सभागृहात संविधान जनजागृती समिती, दापोली तर्फे 26 नोव्हेंबर हा संविधान गौरव दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना ते असं म्हणाले.
आपला मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडताना पुढे ते म्हणाले की, भारतीय राज्यघटना मुर्त स्वरूपात येण्यासाठी जरी संविधान समितीच्या दोनशे नव्याणव सदस्यांचा सहभाग असला तरी या प्रत्येक सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका व सुचनांना बाबासाहेबांनीच एकहाती उत्तरे देवून त्यांचे शंका निरसन केले आणि त्यानंतरच हिंदुस्थानची जगात सर्वात मोठी ठरलेली निर्विवादपणे अस्तित्वात आली.

Comments are closed.