प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांसह हिंदवी स्वराज्य उखडून टाकण्याचा विडा उचलून साठ हजारांच्या फौजेनिशी विजापुराहून चालून आलेल्या बलाढय़ अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर काढला. त्या शिवप्रतापाचे स्मरण म्हणून सालाबादप्रमाणे गुरुवारी (दि. 27) किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन सोहळा पारंपरिक उत्साहात साजरा होत आहे. या सोहळय़ाची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या अलौकिक साहसाच्या-पराक्रमाच्या घटनेला गुरुवारी 366 वर्षे पूर्ण होत आहेत. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी या तिथीला 10 नोव्हेंबर 1659 रोजी हा अलौकिक शिवप्रताप घडला होता. या महान युद्धाचे स्मरण म्हणून दरवर्षी प्रतापगडावर शिवप्रतापदिन मोठय़ा उत्साहात साजरा होतो.
गुरुवारी (दि. 27) होणारा हा पारंपरिक आणि आध्यात्मिक वारसा जपणारा सोहळा यावर्षी अधिक आकर्षक, शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक वैभवाने सजणार आहे. भवानी माता मंदिर परिसर, शिवप्रतिमा मिरवणूक आणि शिवपुतळा जलाभिषेकाच्या विधीमुळे संपूर्ण महाबळेश्वर शिवमय होणार आहे. शिवप्रतापदिनाची सुरुवात भवानी मातेस अभिषेक आणि आरतीने होणार आहे.
शिवप्रताप दिनानिमित्त किल्ले प्रतापगडावर स्वच्छता मोहीम राबवून विद्युत रोषणाई केली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या सूचनेनुसार संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. शिवप्रतापदिनानिमित्त प्रतापगडावर हजारो शिवभक्त अभिवादन करण्यासाठी येतात.
अफजल खान कबर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
n शिवप्रतापदिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रतापगडावरील अफजल खान कबरीच्या सभोवतालच्या तीनशे मीटर परिसरात दि. 26 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 24 जानेवारी 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत भारतीय नागरिक संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रतिबंध करण्याचा आदेश जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी यांनी जारी केला आहे.

Comments are closed.