पाकिस्तानने इतका निर्लज्ज नसावा.
राममंदिरासंबंधी प्रतिक्रियेवर केंद्राकडून प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मानवाधिकार आणि अल्पसंख्याकांचे अधिकार यांच्यासंबंधी आम्हाला उपदेश करण्याचा निर्लज्जपणा पाकिस्तानने करु नये, असे टीकास्त्र भारताने सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी साकारलेल्या भव्य राममंदिरावर ‘धर्मध्वजारोहण’ केले. त्यासंबंधात पाकिस्तानने अश्लाघ्य टिप्पणी केली होती. त्यामुळे भारताने पाकिस्तनला त्याची जागा दाखवून देणारे वक्तव्य केले आहे. आपल्या स्वत:च्या देशात अल्पसंख्याकांची स्थिती काय आहे, हे जरा त्या देशाच्या सरकारने डोळे उघडून पहावे. स्वत:च्या स्थितीत सुधारणा करण्याकडे लक्ष द्यावे, असा उपरोधिक टोलाही लगावण्यात आला आहे.
धर्मध्वजारोहणाच्या ऐतिहासिक कार्यक्रमानंतर पाकिस्तानने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने अत्यंत शेलकी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भारतात इस्लामद्वेष वाढत असून मुस्लीमांवर हल्ले होत आहेत. धर्मध्वजारोहण झाल्यानंतर मुस्लीमांच्या छळवणुकीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनांकडे दुर्लक्ष करु नये. संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारतातील इस्लामी वारसा सुरक्षित राखण्यासाठी कृती करावी, असे आवाहनही पाकिस्तानने केले होते.
उपदेश करणे बंद करा
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायाची जी ससेहोलपट होत आहे, ती त्याने आधी बंद करावी. तेथील अल्पसंख्याकांचे जीवन पाकिस्तान सरकारच्या धोरणांमुळे असह्या झाले आहे. धार्मिक छळाला तेथील अल्पसंख्याकांना सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. अन्य धर्मांचा द्वेष तर पाकिस्तानच्या रक्तातच आहे. अशा स्थितीत पाकिस्तानने इतरांना मानवाधिकारांचा उपदेश करावा, हा बेशरमपणाचा कळस आहे. पाकिस्तानातील हिंदू, शीख, बलोच आणि अहमदिया समुदायांचे नागरीक तेथे नरकयातना भोगत आहेत, त्याकडे जरा त्या देशाने लक्ष द्यावे, अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही व्यक्त केली.
Comments are closed.