मेट्रो प्रकल्पांसाठी 500 कोटींचे कर्ज, निधी वितरणात ठाणे जिल्ह्याला झुकते माप

मुंबई महानगर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळय़ासमोर ठेवत नगर विकास विभागाने दहिसरपासून मीरा रोड, ठाणे-कल्याणपर्यंतच्या सुमारे विविध मार्गांवरील नऊ मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीसाठी सुमारे 498 कोटी 74 लाख 90 हजार रुपयांचे बिनव्याजी दुय्यम स्वरूपाचे कर्ज वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
मुंबई मेट्रो लाइन 5 म्हणजे ठाणे-कल्याण-भिवंडी या मेट्रो प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) अंमलबजावणी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी पेंद्र सरकारचा 50 टक्के कर तसेच 100 टक्के स्थानिक कर आणि जमिनीच्या खर्चासाठी 1 हजार 352 कोटी 25 लाख रुपये दुय्यम कर्जाच्या स्वरूपात राज्य सरकारकडून एमएमआरडीएला द्यायचे आहेत. या दुय्यम स्वरूपातील कर्जाची परतफेड एमएमआरडीए करणार आहे. या प्रकल्पासाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून राज्याच्या नगरविकास विभागाने 52 कोटी 38 लाख 60 हजार रुपये दुय्यम कर्जाच्या स्वरूपात वितरित करण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे.
त्याचबरोबर मुंबई मेट्रो लाइन (6) स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी विक्रोळी या प्रकल्पासाठी 32 कोटी 95 लाख 20 हजार रुपये, मुंबई मेट्रो मार्ग (2 अ) दहिसर पूर्व डीएन नगर प्रकल्पासाठी 28 कोटी 89 लाख 70 हजार रुपये, मुंबई मेट्रो (2ब) डीएन नगर मंडाळे प्रकल्पासाठी 112 कोटी 80 लाख रुपये अशाप्रकारे विविध प्रकल्पांसाठी कोटय़वधीचा निधी दिला आहे.
याआधी 800 कोटींची खैरात
यापूर्वी नगर विकास विभागाने महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायतींवर 800 कोटी रुपयांहून अधिक निधीची खैरात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मूलभूत सुविधा उभारण्याच्या नावाखाली हा निधी दिला आहे. शिंदे गट आणि भाजपचे मतदारसंघ डोळय़ासमोर ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी अधिक दिला आहे. आता मेट्रो प्रकल्पाच्या निधी वितरणात नगर विकास विभागाने ठाणे जिह्याला प्राधान्य दिले आहे.

Comments are closed.